आपल्याकडे काय निवडणुका आल्या की गल्लीगल्लीमध्ये बाईक्स उडवणारे धडाडीचे कार्यकर्ते खोऱ्याने सापडतात. साहेबाच्या कृपेने टाकी फुल करून मिळते म्हटल्यावर काय मजाच आहे. साहेबांचा विजय झाल्यावर मग बक्षिसांची आणखी खैरात. मग सगळे कार्यकर्ते ‘आसमान में’. विजयी मिरवणुकीचं निमित्त सांगत शहरातल्या रस्त्यांवर बेफाम गाड्या, बाईक्स चालवणं असो किंवा मग हायवेवर अॅक्सिलरेटरवर फुल पाय ठेवत भरधाव राईड असो. कोणाला कशाची चिंता नाही.
अशा या सगळ्या ‘बाईकर्स’ना आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणेची दमछाक होते. आधीच कामाच्या प्रचंड ताणाखाली असलेल्या पोलिस दलाला या नव्या डोकेदुखीला सामोरं जावं लागतं. आणि पोलीस बंदोबस्त तरी किती ठेवणार? शेवटी प्रत्येकाच्या मागे एक पोलीस लावता येतच नाही ना!
यूएईच्या पोलिसांनी यावर आता नामी शक्कल शोधून काढली आहे. संयुक्त अरब अमिरातीमधल्या हायवेवर अश्या भरधाव गाड्या चालवणाऱ्यांच प्रमाण प्रचंड आहे. तिथलं ‘स्पीड लिमिट’ हे १२० किलोमीटर प्रतितास असं असलं तरी त्यापेक्षाही जास्त वेगात कार किंवा बाईक चालवणारे तिथे आहेत. किती ती हौस?
आता या हायवेवर सगळीकडे पोलीस बंदोबस्त ठेवणं शक्य नाही. पण तरीही अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी तिथल्या पोलिसांनी एक ट्रिक वापरली आहे. तिथल्या हायवेवर या पोलिसांनी त्यांच्या कारसारखे दिसणारे काही कार्डबोर्ड कटआऊट्स लावले आहेत. हे कटआऊट्स खरे वाटावेत यासाठी त्यांनी त्या ‘गाडीवर’ पोलिसांचे खरे दिवेही लावले आहेत.
आता आपण बेफाम गाडी चालवताना अचानक ‘मामा’ दिसला तर आपण घाबरणारच ना? यूएई पोलिसांनी लढवलेल्या या आयडियामुळे तिथल्या E311 या हायवेवरच्या अपघातांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. हे कटआऊट्स एवझ्या चांगल्या पध्दतीने बनवले गेले आहेत की धुवाधार गाडी चालवणारे कटआऊट्स बघून लगेच ‘लायनीत’ येतात. पाहा व्हिडिओ…
सौजन्य- फेसबुक
आता हे कटआऊट्स आहेत हे काही काळाने लोकांच्या लक्षात येणारच. त्यामुळे लोकांच्या फार लक्षात येण्याआधीच यूएई पोलिसांनी हे कटआऊट्स काढून टाकत आता नवी शक्कल लढवायला सुरूवात केली आहे.
आपल्याकडे पण ही पध्दत राबवायला हरकत नाही म्हणा. पण आपल्याकडचे कार्यकर्त हे कार्डबोर्ड बघून स्पीड कमी करण्याच्या एेवजी त्या कार्डबोर्डचा वापर ‘सन्माननीय साहेब’ च्या पोस्टरबाजीकरता करण्याची शक्यताच जास्त. नाही म्हणायला बंगळुरूमध्ये २०१३ साली या कटआऊट्सचा प्रयोग करून पाहिला गेला होता. त्यानंतर काही झालं असेल तर आपल्या एेकण्यात नाही बाबा!