भारतासह जगभारातील पुरुषांचा स्पर्म काउंट कमी होत आहे. शास्त्रज्ञांनी सात वर्षांपर्यंत केलेल्या एका सर्वेक्षणाद्वारे असा दावा करण्यात आला आहे. हे सर्वेक्षण ह्यूमन रिप्रोडक्शन अपडेट जर्नलमध्ये प्रकाशित केली आहे. हे सर्वेक्षण २०११ ते २०१८ या कालावधीत करण्यात आलं. यासाठी जवळपास सात वर्षांचा कालावधी लागला. विशेष म्हणजे या सर्वेक्षणातून जो रिझल्ट मिळाला, ते पाहून शास्त्रज्ञांनाही धक्का बसला.
आंतरराष्ट्रीय स्तरावर हा शोध लावण्यात आला असून यामध्ये शास्त्रज्ञांच्या अनेक ग्रुपने सहभाग घेतला होता. यामध्ये शास्त्रज्ञांनी ५३ देशांच्या ५७ हजारांहून अधिक पुरुषांच्या शुक्राणूंचे नमूने तपासून २२३ केस स्टडीज केल्या. यामध्ये दक्षिण अमेरिका, आशिया आणि आफ्रिकाचे देश सहभागी झाले होते. याआधी अशाप्रकारचं सर्वेक्षण कधीच करण्यात आलं नव्हतं. पहिल्यांदाच या देशांतील लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आणि त्यांच्यातील स्पर्म काउंट आणि स्पर्म कॉन्सन्ट्रेशन कमी झाल्याचं दिसलं. याआधी उत्तर अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियात या प्रकारचं सर्वेक्षण करण्यात आलंय आणि तिथेही अशाच प्रकारची आकडेवारी समोर आली आहे.
सर्वेक्षणातून ही माहिती आली समोर
शुक्राणूंच्या संख्येचा परिणाम फक्त प्रजनन क्षमतेवरच होत नाही, तर पुरुषांच्या आरोग्यावरही होतो. स्पर्म काउंटच्या कमजोरीमुळं टेस्टिकुलर (रिप्रोडक्टिव पार्ट) कर्करोगासह अन्य आजारांचे कारण ठरू शकते. तसंच याचा परिणाम पुरुषांच्या आयुर्मानावरही होतो.
काळजी घ्या, शास्त्रज्ञ म्हणतात….
सर्वेक्षणात सामील झालेल्या हिब्रू युनिवर्सिटीच्या प्रोफेसर हेगाई लेविन यांनी पीटीआयशी बोलताना म्हटलं, भारत देशात खूप मोठ्या प्रमाणात स्पर्म काउंट कमी झाला आहे. ही स्थिती संपूर्ण जगासारखी आहे. खराब जीवनशैली आणि हवेत मिसळलेली धोकादायक केमीकल्स स्पर्म काउंट कमी होण्याची प्रमुख कारणे आहेत. मागील ४६ वर्षात संपूर्ण जगभरात स्पर्म काउंटमध्ये ५० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. मात्र आताच्या कालावधीत यामध्ये वेगानं घसरण पाहायला मिळाली आहे. ही परिस्थिती महामारीसारखी आहे. हे सर्वच ठिकाणी होत आहे.
माणसाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होणार?
हेगाई लेविन यांनी माध्यमांशी बोलताना पुढं म्हटलं की, माणसांसह जगातील प्रत्येक प्रजातीला सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना स्वच्छ आणि पोषक वातावरण उपलब्ध करून दिलं पाहिजे. तसंच प्रजनन क्षमतेवर प्रभाव पाडणाऱ्या गोष्टींचा समूळ उच्चाटन केलं पाहिजे. १९७३ ते २०१८ च्या आकडेवारीनुसार, शुक्राणू्ंच्या संख्येत प्रतिवर्ष १.२ टक्क्यांच्या सरासरीनं घसरण झाली आहे. तर वर्ष २००० नंतर प्रतिवर्ष २.६ टक्क्यांनी यात वाढ झाली आहे. आपल्या समोर ही एक मोठी समस्या उभी ठाकली आहे. या समस्येचं निराकरण करावं लागेल, नाहीतर माणसांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो. भारतात एका वेगळ्या पद्धतीनं सर्वेक्षण केला पाहिजे, असंही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.