स्पाइसजेटचं विमान एका विजेच्या खांबाला धडकल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. पार्किंगमधून विमान मागे घेत असताना ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत विमानाच्या एलेरॉनचे नुकसान झाले आहे. जबरदस्त धडक बसल्याने विजेचा खांबा देखील वाकला. यामुळे काही काळ भीतीचं वातावरण पसरलं होतं. याबाबत विमानतळ प्रशासनाला माहिती मिळताच त्यांनी तातडीने पावलं उचलली. विमान दिल्लीहून जम्मूला जाणार होते. प्रशासनाने तात्काळ प्रवाशांना दुसऱ्या विमानाने जाण्याची सोय केली. स्पाइसजेटचे बोईंग ७३७-८०० विमान सोमवारी सकाळी मागे घेत असताना विमानतळाच्या एका मोकळ्या जागेत असलेल्या विजेच्या खांबा उजवा पंख्याला धडकला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, विमान दिल्लीहून सकाळी ९.२० वाजता निघणार होते.
डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या घटनेत कोणताही प्रवासी जखमी झाला नाही आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
फेब्रुवारी महिन्यातही दिल्ली विमानतळावरून अमृतसर येथे जाणाऱ्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले होते. हे विमान एअर विस्ताराचे होते. विमानतळ अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबकडे जाणार्या एअर विस्तारा विमानाला हायड्रोलिक ब्रेक काम न केल्यामुळे दिल्ली विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. त्यावेळी विमानात एकूण १४६ प्रवासी होते. इमर्जन्सी लँडिंगच्या वेळी एअर पोर्ट प्राधिकरणाने सर्व मानकांचे पालन केले. यानंतर सर्व प्रवाशांना दुसऱ्या विमानाने अमृतसरला पाठवण्यात आले.