Abhinav Arora News: सोशल मीडियावर बाल संत म्हणून प्रसिद्ध झालेल्या अभिनव अरोरा या दहा वर्षांच्या मुलाबाबत रोज नव्या नव्या बातम्या येत आहेत. स्वामी रामभद्राचार्य यांचे दर्शन घेण्यासाठी गेला असताना स्वामींनी अभिनव अरोराला चांगलेच खडे बोल सुनावले होते. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अभिनव अरोराची टिंगल टवाळी करण्यात येत होती. तसेच त्याला भक्तांनी आयफोन १६ भेट दिल्याचाही व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर आता अभिनव अरोराची आई ज्योती अरोरा यांनी त्याला बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या असल्याचा आरोप केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना ज्योती अरोरा म्हणाल्या की, सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्यावर सामाजिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एक महिन्यापासून आमच्या मुलाबद्दल अपप्रचार सुरू आहे. अभिनवने काहीच चुकीचे केलेले नाही, ज्यामुळे आमच्या मुलाला धमकी दिली जावी. आमच्या मुलाला मारण्याची धमकी वारंवार दिली जात आहे. फोन करून आमच्या मुलाबद्दल अपशब्द काढले जात आहेत. आमच्या मुलाने भक्ती करण्याशिवाय इतर काही केलेले नाही. आम्हाला आता लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून अभिनवला मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

अभिनव अरोराचे कुटुंबिय दिल्लीमध्ये राहतात. अभिनव तीन वर्षांचा असताना त्याचा आध्यात्मकि प्रवास सुरू झाला होता, असा त्याच्या पालकांचा दावा आहे. स्वामी रामभद्राचार्य यांनी मुलाला ओरडा दिला होता, याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर ज्योती अरोरा म्हणाल्या की, मोठ्या माणसांनी ओरडणे हाही एक आशीर्वादच असतो. हा व्हिडीओ २०२३ चा आहे. वृदांवनमध्ये स्वामीजी आले असताना आम्ही दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. मात्र मंचावर गेल्यानंतर अभिवन स्तब्ध झाला होता.

तो मुर्ख मुलगा – स्वामी रामभद्राचार्य

अभिनव अरोराला ओरडल्याबद्दल जेव्हा स्वामी रामभद्राचार्य यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा स्वामी रामभद्राचार्य जोरजोरात हसले आणि म्हणाले की, तो मुलगा मूर्ख आहे. तो म्हणतो, भगवान कृष्ण आणि तो एकत्र शिक्षण घेत आहे. देव आता त्याच्याबरोबर शिक्षण घेणार का? त्याला बोलायची अक्कल नाही. त्यामुळे मी वृदांवनमध्येच त्याला ओरडा दिला होता.

आई-वडिलांनी बालपण हिरावून घेतलं

अभिनव अरोरा केवळ १० वर्षांचा आहे. या वयात त्याला आध्यात्माची फारशी कल्पना नाही. मात्र आई-वडिलांनी प्रसिद्धीसाठी त्याला भरीस घातले असून बाल संत म्हणून पुढे आणले, अशी टीका सोशल मीडियावरून केली जात आहे. अभिनवचे शिक्षण घेण्याचे वय आहे. त्याला शिक्षण घेऊ दिले पाहीजे. अशाप्रकारे त्याला बाल संत म्हणून पुढे आणल्यास त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर परिणाम होईल, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spiritual orator abhinav arora family claims threat from lawrence bishnoi gang kvg