असे म्हणतात की, माणसांप्रमाणेच प्राण्यांनाही भावना असतात. त्यांचे ही मन असते. प्राण्यांनाही आनंद होतो, दु:ख होते. याची प्रचिती देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ काही माकडांचा आहे ज्यामध्ये एका अनपेक्षित घटनेनंतर शोक व्यक्त करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यातही चटकन पाणी येईल.
आज काल माणसांमध्ये माणुसकी राहिली नाही तिथे मुक प्राण्यांनी मात्र ती टिकवून ठेवली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, माकडांच्या हालचाली टिपण्यासाठी एका स्पाय कॅमरा असलेल्या नकली माकडाला एका झाडावर ठेवण्यात आले आहे. हे नकली माकड हुबेहुब खऱ्याखुऱ्या माकडांसारखेच दिसत असून त्याच्या डोळ्यांमध्ये एक कॅमेरा असल्याचे दिसते. हे माकड नकली असले तरी पण त्याच्या आसापासच्या सर्व माकडांना ते दुसऱ्या प्रजातीचे आहे असे वाटते. त्यामुळे सर्वजण त्या नकली माकडाच्या आसपास गोळा होतात. कुतूहलाने त्याच्या जवळ येता आणि त्याला हात लावण्याचा प्रयत्न करतात, कोणी त्याचे शेपूट ओढण्याचा प्रयत्न करते तर कोणी त्याला उचलून दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न करते तेवढ्यात ते नकली माकड झाडावरुन खाली पडते आणि पुढील सर्व घटना अनपेक्षितपणे घडत जातात.
हेही वाचा – चला हवा येऊ द्या! पीएमपीएल बससमोर कारने घेतली माघार; व्हायरल होतोय व्हिडीओ
सर्व माकडांना नकली माकड झाडावरून पडून मेले असे वाटते. ते त्या नकली माकडाजवळ जवळ येऊन त्याला उठवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्याचा वास घेतात. एक माकड येते आणि त्या बाहुलीला उचलून घेते. नंतर हळू हळू सर्व माकडे त्याच्या जवळ येतात आणि नकली माकडाच्या मृत्यूचे दु:ख व्यक्त करु लागतात. एकमेकांच्या गळ्यात पडून रडू लागतात. ते माकड दुसऱ्या प्रजातीचे आहे असा समज असूनही त्याच्या मृत्यूचा शोक सर्व माकडे व्यक्त करताना दिसत आहे. हा ह्रदयस्पर्शी व्हिडीओ पाहून तुमचे डोळेही भरून आले असतील.
व्हिडीओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला असून अनेकांनी कमेटंस केल्या आहेत. अनेकांनी व्हिडीओ पाहून प्राण्यांबरोबर असा प्रँक केल्याबद्दल राग व्यक्त केला. कोणी म्हणाले ”कृपया प्राण्यांबरोबर असा प्रँक करू नका” तर कोणी व्हिडीओ शुट करणाऱ्यांची बाजू घेत सांगितले की, ”जे घडले ते अनपेक्षित होते.” एकाने म्हटले की, ”ती बाहूली खोटी असेल पण त्या माकडांच्या भावना खोट्या नव्हत्या.” तर दुसरा म्हणाला, माणसापेक्षा हे प्राणी चांगले आहेत.