बंगालच्या उपसागरात आलेल्या मिचौंग चक्रीवादळाने तमिळनाडूत धुमाकूळ घातला आहे. या चक्रीवादळामुळे येथील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. ज्यामुळे चेन्नई आणि परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे चेन्नईतील रस्त्यांसह विमानतळावर पाणी साचल्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या पावसामुळे चेन्नईत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून लोकांना घरातून बाहेर पडणं कठीण झालं आहे.

सोशल मीडियावर चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसाची भयानक दृश्य पाहायला मिळत आहेत. ज्यामध्ये काही ठिकाणी मोठमोठी झाडं रस्त्यावर उन्मळून पडलेली दिसत आहेत. तर काही ठिकाणी विजेचे खांब पडले आहेत. इमारतींच्या पार्किंगमध्ये पाणी साचलं आहे. इतकेच नव्हे तर पावसामुळे चेन्नई विमानतळाच्या धावपट्टी आणि भुयारी मार्गावरही पाणी साचले आहे, ज्याचा परिणाम हवाई वाहतुकीवर झाला आहे. याच चक्रीवादळामुळे तेथील लोकांना कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे. हे तुम्हाला पुढील काही व्हायरल व्हिडीओ पाहून समजेल.

मिचौंग चक्रीवादळ आज आंध्र प्रदेशमधील बापटलाजवळ धडकणार असून मिचौंगच्या वाऱ्याचा वेग तीव्र असून तो सध्या ९०-११० किमी प्रतितास असा आहे. हवामान प्रणाली ७ डिसेंबरपर्यंत कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर या चक्रीवादळामुळे विमानासह रेल्वे सेवाही रद्द करण्यात आली आहेत.

या चक्रीवादळाच्या निमित्ताने आंध्र प्रदेशातील जिल्हाधिकारी हाय अलर्टवर आहेत. कारण, मिचौंग चक्रीवादळ नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यान जमिनीवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे खबरदारीचा उपाय केला जात आहे. दरम्यान, मिचौंग चक्रीवादळामुळे दक्षिणेतील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसंच, महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Story img Loader