Noida Girl Sexual Assault: नोएडामधील एका इन्स्टाग्राम इन्फ्ल्युएन्सरने एका व्हिडीओद्वारे अज्ञात इसमावर विनयभंग आणि लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केले. लैंगिक गैरवर्तन झाल्यानंतर याची तक्रार पोलिसांत द्यायला गेल्यानंतर पोलिसांनी सदर तरूणीलाच झापल्याचा प्रकार घडला आहे. यानंतर या तरुणीने एका व्हिडीओद्वारे पोलिसांच्या असंवेदनशीलतेवर प्रश्न उपस्थित केले. नोएडामधील कोतवाली सेक्टर ४९ येथे राहणारी तरूणी दोन दिवसांपूर्वी आपल्या सोसायटीत सायंकाळी पावसात भिजण्याचा आनंद घेत होती, यावेळी एका अज्ञात इसमाने तिच्याशी लैंगिक गैरवर्तन करत तिचे कपडे फाडल्याचा आरोप तरुणीने केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तरुणीने कोणते आरोप केले?

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये तरूणीने म्हटले की, मी माझ्या सोसायटीच्या आवारात सायंकाळी ७.३० दरम्यान पावसात भिजण्याचा आनंद घेत होते. तेव्हा एक इसम माझ्याजवळ आला आणि लैंगिक गैरवर्तन करू लागला. या इसमाने माझे कपडेही खेचून फाडले, असा दावा तरूणीने केला. त्याचवेळी सोसायटीमधील दोन मुली तिथून जात असल्याचे पाहून सदर इसमाने पळ काढला.

हे वाचा >> Satara News: ‘सेल्फी’ काढताना तरुणी २५० फूट दरीत कोसळली; पुढे जे झालं ते चमत्कारापेक्षा कमी नाही, रेस्क्यूचा थरारक VIDEO

पोलिसांकडून पीडित तरुणीलाच दमदाटी

सदर तरूणीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करून तिच्याबरोबर झालेला प्रसंग कथन केला. त्यानंतर भारतीय टॉक या एक्स अकाऊंटवरही हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. प्रकरण गंभीर असतानाही कोतवाली सेक्टर – ४९ च्या पोलिसांनी माझी तक्रार गांभीर्याने घेतली नाही. उलट मलाच सायंकाळी पावसात बाहेर का पडलीस? अशा शब्दांत दटावल्याचे तरुणीने सांगितले आहे. भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी सकारात्मक पावले उचलणे गरजेचे आहे, असे आवाहनही तिने केले.

सदर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गौतम बुद्ध नगर पोलीस ठाण्याकडून उत्तर देण्यात आले आहे. सीसीटीव्हीच्या आधारावर आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा >> Kulhad pizza couple viral video: कुल्हड पिझ्झा कपलने खासगी व्हिडीओ प्रसिद्धीसाठी व्हायरल केला? स्वःच सांगितली खरी कहाणी

दरम्यान सोशल मीडियावर काही जणांनी पीडित तरुणालाही ट्रोल केले आहे. पीडित तरुणीच्या इन्स्टाग्राम हँडलवर अनेक अश्लील व्हिडीओ पोस्ट केल्याचा आरोप केला जात आहे. तसेच तिने केलेले आरोप हा तिचा बनाव असून केवळ फॉलोअर्स वाढविण्यासाठी तिने ही कथा रचल्याचाही आरोप काही युजर्स करत आहेत.

इन्फ्ल्युएन्सर असली तरी तक्रार गांभीर्याने घ्यावी

सदर तरूणीचे नाव अन्वेसा डे असून ती इन्स्टाग्रामवर फॅशन व्हिडीओज पोस्ट करत असते. तिचे ६४ हजार फॉलोअर्स आहेत. तरुणी इन्स्टाग्राम इन्फ्ल्युएन्सर आहे म्हणून तिची कुणी छेड काढावी आणि पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेऊ नये, यावरही काही युजर्स टीका करत आहेत. पोलिसांनी सर्वच महिला आणि मुलींच्या तक्रारीला गांभीर्याने घेतले पाहीजे, असे काही युजर्सचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stranger groped and ripped my shorts police said why were you out in rain at evening noida young influencer shares video kvg