गेल्या काही महिन्यांपासून देशभरात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढतच चालली आहे. वारंवार कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना वेगवेगळ्या शहरातून समोर येत आहेत. यातच पंजाबमधील भटिंडा भागातून एक ताजे प्रकरण समोर आले आहे, ज्यात पाच भटक्या कुत्र्यांनी चक्क दोन चिमुकल्यांवर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न केला. यातील एक चिमुकली पळाली, पण दुसऱ्यावर पाच पिसाळलेल्या कुत्र्यांनी घेराव घालत हल्ल्याचा प्रयत्न केला, या भयंकर घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, दोन लहान मुलं रात्रीच्या वेळी रस्त्याने चालत असतात. यावेळी एक कुत्रा भुंकत त्यांच्या दिशेन धावत येतो, यामुळे दोघही खूप घाबरतात आणि कुत्र्यापासून जीव वाचवण्यासाठी पळत सुटतात. एक चिमुकली पळत पुढे जाते, पण तिच्याबरोबर असलेल्या चिमुकल्याच्या दिशेने एकाच वेळी दोन कुत्रे वेगाने पळत येतात आणि पुढे जाऊन त्याला रस्त्यावर पाडतात. खाली पडताच चिमुकला जीव वाचवण्यासाठी जोरजोरात रडू लागतो. यावेळी जवळपास चार ते पाच भटके कुत्रे त्याच्यावर जीवघेणा हल्ला करतात. इतक्यात चिमुकल्याच्या दिशेने काही महिला जीव तोडून धावत येतात आणि त्याला कुत्र्यांपासून वाचवतात. या घटनेमुळे आता परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
VIDEO : वंदे भारत ट्रेनमध्ये पत्नीला सोडायला गेला अन् अचानक बंद झाला दरवाजा; त्यानंतर घडले असे की,…
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबच्या भटिंडा येथील नॅशनल कॉलनीत भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. परिसरातील नागरिक सांगतात की, भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यात या घटनेमुळे लहान मुलेच नाही तर मोठी माणसंदेखील खूप घाबरली आहेत. अशा परिस्थितीत मुलांना घराबाहेर पाठवतानाही भीती वाटतेय.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याबाबत अनेकदा महापालिकेकडे तक्रार केली, मात्र कोणतीही पावलं उचलली गेली नाहीत. आता चिमुकल्याचा जीव वाचला म्हणून, नाही तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. या घटनांना जबाबदार कोण असेल? असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.
दरम्यान, देशभरातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना समोर आल्या आहेत, ज्याचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे या प्रकरणी नागरिकांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे. सोशल मीडियावरील युजर्सचे म्हणणे आहे की, अनेक भागांत अशा घटना घडतायत, भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाने लोक त्रस्त आहेत.