गोड खाणं ज्यांना मनापासून आवडतं त्याच्यासाठी ‘जिलेबी’ म्हणजे अगदी आवडता पदार्थ . मिठाईच्या दुकानात जेव्हा हलवाई आपल्यासमोरच गरम गरम जिलेबी तयार करतो. नंतर ती पाकात टाकतो आणि थोड्या वेळाने गरम जिलेबीचा बाऊलमध्ये तुमच्या समोर सर्व्ह केली जाते. तेव्हा तोंडाला पाणी सुटतं इतकं नक्की. पण, जर आम्ही तुम्हाला सांगितलं की, एका मिठाईच्या दुकानात थ्रीडी प्रिंटरच्या सहाय्याने जिलेबी बनवली जाते आहे तर तुमचा विश्वास बसेल का ? नाही. तर सोशल मीडियावर आनंद महिंद्रांनी असाच एक हटके व्हिडीओ शेअर केला आहे ; ज्यात जिलेबी थ्रीडी प्रिंटरच्या सहाय्याने बनवली जाते आहे.
व्हायरल व्हिडीओ पाकिस्तानचा आहे. मिठाईच्या या दुकानात थ्रीडी प्रिंटर नोझलचा अनोखा वापर केला जातो आहे. या थ्रीडी प्रिंटरला एक पाईप जोडण्यात आला आहे. या पाईपमध्ये जलेबीचे पीठ आहे ; ज्याच्या मदतीने तेलात गोल गोल जिलेबी तयार केली जाते आहे. काही सेकंदात या हलवाईने कढईभरून जिलेबी तयार केलेली दिसत आहे ; जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल एवढं नक्की.
व्हिडीओ नक्की बघा :
पाककलेला तंत्रज्ञानाची जोड :
सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ पहिला आणि रिपोस्ट करत लिहिले की, मान्य करतो की, मी तंत्रज्ञानाचा शौकीन आहे. पण, थ्रीडी प्रिंटर नोझलचा (3D printer nozzle) उपयोग करून जिलेबी बनवताना पाहून माझ्या मनात संमिश्र भावना निर्माण झाल्या आहेत. कारण – जिलेबी माझा आवडता पदार्थ आहे आणि हातात पीठ घेऊन जिलेबी तळणे आणि त्याला साखरेच्या पाकात सोडणे ही एक कला आहे. तर हा व्हिडीओ पाहून जसं मी विचार करतो आहे त्यावरून मला असे वाटते की, मी खूप जास्त जुन्या विचारांचा आहे ; अशी कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिली आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांच्या अधिकृत @anandmahindra या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी विविध प्रतिक्रिया मांडत आहेत. एक युजर म्हणतोय की, ‘मशीनच्या सहाय्याने जिलेबी बनवणे ठीक आहे . पण, त्या जिलेबीला माणसाच्या हाताची चव नसेल’ . तर दुसरा युजर म्हणतो की, ‘आधुनिक समस्येसाठी आधुनिक उपाय’. तर तिसरा युजर म्हणतोय ‘हाताने बनवल्या जाणाऱ्या जलेबीच बेस्ट आहेत.