रस्त्यावरील अनेक फूड स्टॉल्सवर खाद्यप्रेमींना नवीन चव देण्यासाठी विविध पदार्थांवर वेगवेगळे प्रयोग होत असतात. या वेळी मॅगी, समोसा किंवा मोमोजला वेगळी चव देण्यासाठी काही जण त्यात कधी भेंडी घालतात तर काही जण मॅगीमध्ये आईस्क्रीम मिक्स करून काहीतरी वेगळीच डिश बनवतात. कधीकधी यातून काहीतरी चांगला पदार्थ बनतो, पण काही वेळा एक वेगळीच डिश बनते. पण एखाद्या पदार्थासोबत काही वेगळं करण्याच्या नादात अनेकदा लोक असं काही फ्युजन ट्राय करतात, जे पाहून यूजर्सही कपाळावर हात मारत आहेत. अशाच एका पदार्थाच्या फ्युजनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एक विक्रेता छोले-भटुरेमध्ये असा एक पदार्थ मिक्स करतोय जो पाहून तुमच्याही तोंडून ‘अरे, यांना आवरा रे,’ असे आल्याशिवाय राहणार नाही. विक्रेत्याने छोले-भटुरेपासून तयार केलेली डिश पाहून आता अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
छोले-भटुरे आपल्यापैकी अनेकांची आवडती डिश असेल. ऋतू कोणताही असो, छोले-भटुरे आवडीने खाल्ले जातात. पण आपल्या आवडत्या डिशवर अनेक अत्याचार झाले आहेत. चॉकलेट मोमोज, गुलाबजाम पराठे आणि ओरियो मॅगीनंतर आता आइस्क्रीम छोले-भटुरे बाजारात आले आहेत. हे बघून छोले-भटुरेप्रेमींच्या मनात खळबळ माजली.
व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक कूक फ्युजन आईस्क्रीम बनवत असल्याचे दिसत आहे. पण आइस्क्रीमचे हे फ्युजन काजू, बदाम वैगरे टाकून नाही तर चक्क छोले-भटूरे टाकून करण्यात आले आहे. यासाठी वेंडर प्रथम भटुरेचे चाकूने लहान तुकडे करून घेतो. मग त्यावर तो चणे आणि चटणी टाकतो. यानंतर वितळलेले आईस्क्रीम डिशवर टाकतो आणि काही वेळ सर्व गोष्टी एकत्र करून त्याला रोलचा आकार देतो. यानंतर तो रोलवर चणे, कांदे आणि लोणचे घालून डिश सर्व्ह करतो. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर Cravings (@cravingseverytime) नावाच्या अकाउंटद्वारे शेअर करण्यात आला आहे.
ही डिश पाहून छोले-भटुरे खाणे विसरून जाल
छोले-भटुरे आइस्क्रीमचा हा व्हिडीओ जुना असल्याचे सांगितले जात आहे. जो आता पुन्हा व्हायरल होत आहे. या व्हिडीओला २.५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर अनेक युजर्सनी खूप मजेदार कमेंट्स केल्या आहेत. काही युजर्स या डिशवर संताप व्यक्त करत आहेत. तर अनेक जण मजेशीर कमेंट करत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, यासाठी वेगळी शिक्षा आहे. दुसर्याने कमेंट करत लिहिले की, हे सर्व काय पाहावे लागत आहे? आइस्क्रीम छोले-भटुरेही आला आहे यावर लोकांचा विश्वास बसत नाहीये.