Super Typhoon Yagi hits Vietnam: व्हिएतनामच्या उत्तरेकडील भागाला प्रचंड शक्तीशाली अशा यागी चक्रीवादळचा तडाखा बसला आहे. चक्रीवादळामुळे व्हिएतनाममध्ये १४ जणांचे मृत्यू झाले असून शेकडो लोक जखमी आहेत. तर चीनच्या हेनान प्रांतालाही याचा तडाखा बसला असून तिथे दोन जण ठार आणि सुमारे शंभर जखमी झाले आहेत. यागी गेल्या दशकातील सर्वात शक्तिशाली वादळांपैकी एक असल्याचे वर्णन हवामानशास्त्रीय अधिकाऱ्यांनी केले आहे. व्हिएतनाममधील सरकारने आता मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा दिला आहे. दरम्यान सोशल मीडियावर या चक्रीवादळाचे भीतीदायक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. वादळाच्या तडाख्याने इमारती कोसळत आहेत, घराच्या खिडक्या उडत असल्याचे आणि झाडे उन्मळून पडत असल्याचे दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यागी चक्रीवादळामुळे व्हिएतनामच्या उत्तरेकडील वीज घालविण्यात आली असून यामुळे तीन दशलक्ष लोक अंधारात आहेत. वादळामुळे १,१६,१९२ हेक्टर जमिनीवरील पिक वाया गेले आहे. यामुळे काढणीला आलेल्या भात आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे एपी न्यूज या संकेतस्थळाने म्हटले आहे. उत्तरेकडील चार विमानतळ बंद केल्यामुळे शेकडो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

सोशल मीडियावर यागी चक्रीवादळाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या विनाशाची झलक पाहायला मिळते. व्हिडीओच्या सुरुवातीलाच एका आकाश पाळण्याच्या केबिन खेळण्याप्रमाणे हवेत उडत असल्याचे दिसत आहेत. खिडकीचे कुंपण हवेत उडून गेल्याचे दिसत आहेत. तर रस्त्यावरील स्कुटर वाऱ्याच्या वेगामुळे पडत असल्याचेही दिसत आहे.

व्हिएतनाममध्ये विमानतळे बंद

सदर व्हिडीओ एक्सवर शेअर करण्यात आला असून कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, शक्तीशाली चक्रीवादळ यागीमुळे वारे २४० किमी वेगाने वाहत असून आता हे वादळ चीनमध्ये प्रवेश करत आहे. त्याची काही क्षणचित्रे.

शनिवारी जेव्हा यागीचा व्हिएतनाममध्ये प्रवेश झाला तेव्हा ताशी १५० ते १६६ किलोमीटर इतका त्याचा वेग होता. यामुळे सरकारने अनेक सूचनाही जारी केल्या असून पूर किंवा भूस्खलनाचा धोका असलेल्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहे. राजधानी हनोई आणि हैफॉन्ग या बंदर शहरासह चार विमानतळे बंद करण्यात आली आहेत. यागीने शुक्रवारी दुपारी चीनच्या हेनान प्रांतातील वेनचांग या चिनी शहरातील केंद्राजवळ सुमारे २४५ किमी प्रतितास वेगाने धडक दिली. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, शनिवारी वादळामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आणि किमान ९२ जण जखमी झाले. लाखो लोकांना स्थलांतरित करण्यात आले. फिलिपाइन्समधील ४७,६०० हून अधिक लोक चक्रीवादळामुळे विस्थापित झाले. अनेक देशांतर्गत विमान उड्डाणे विस्कळीत झाली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Strongest typhoon yagi sweeps parts of vietnam 14 dead many injured destruction caused across country and china kvg