जय श्री राम’च्या घोषणेवर आतापर्यंत फक्त भाजपविरोधी पक्षांचे नेतेच संताप व्यक्त करताना दिसत होते, मात्र कॉलेजमध्येही त्यावरून गदारोळ सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील एका खासगी महाविद्यालयात सुरू असलेल्या एका कार्यक्रमादरम्यान ‘जय श्री राम’ अशी घोषणा दिल्याने एका विद्यार्थ्याला स्टेजवरून हकलून देण्यात आले. विद्यार्थ्याने प्रेझेंटेशन देण्यापूर्वी जय श्री राम म्हटल्याने महिला प्राध्यापक संतापल्या ज्यानंतर गदारोळ निर्माण झाला. यानंतर विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला ज्यामुळे कार्यक्रम मधेच थांबवण्यात आला. गोंधळ इतका वाढला की, पोलिसांना पाचारण करावे लागले, यानंतर कसेबसे सर्व विद्यार्थ्यांना शांत करण्यात आले. दुसरीकडे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आता जिल्ह्यातील हिंदू संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. यावर प्राध्यापकाला निलंबित न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा या संघटनांनी कॉलेज व्यवस्थापनाला दिला आहे.
एनएच-9 वर असलेल्या एबीईएस कॉलेजमध्ये इंडक्शनचा कार्यक्रम सुरू होता. एका विद्यार्थ्याला प्रेझेंटेशन देण्यासाठी स्टेजवर बोलावले असता मागून त्याच्या मित्रांनी त्याला आधी जय श्री राम म्हणायला सांगितले. विद्यार्थ्याने त्यांचे ऐकले आणि जय श्री राम म्हणत स्टेजवर आपले प्रेझेंटेशन सुरू केले, मात्र यामुळे तिथे बसलेल्या महिला प्राध्यापकाला राग आला. त्यांनी विद्यार्थ्याला स्टेजवरून खाली उतरण्यास सांगितले. कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमात अशाप्रकारच्या घोषणा देण्यास परवानगी नसल्याचे प्राध्यापकांनी सांगितले.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये यानंतर प्राध्यापक विद्यार्थ्याला ओरड असल्याचे दिसत आहे. यावेळी विद्यार्थ्याने प्रथम त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की, त्याला हे मित्रांनी म्हणण्यास सांगितले होते. पण प्राध्यापक त्याची कोणतीही गोष्ट ऐकून न घेता स्टेजवरून खाली येण्यास सांगतात.
महिला प्राध्यापिकेने विद्यार्थ्याला स्टेजवरून जाण्यास सांगितल्यानंतर तिथे बसलेल्या उर्वरित विद्यार्थिनींनी संताप व्यक्त करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. दरम्यान कोणीतरी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून विद्यार्थ्यांना शांत केले. दरम्यान, एका विद्यार्थ्याने या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला असून, तो व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर हिंदू संघटनाही सक्रिय झाल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अशा कोणत्याही व्हिडिओची माहिती अद्याप मिळालेली नाही. व्हिडिओबाबत तक्रार आल्यास कारवाई केली जाईल.