Desi Jugaad Video : देसी जुगाडचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकदा यातील व्हिडीओ खरोखरच लोकांना उपयोगी पडणारे असतात. छोट्यापासून मोठ्या कामांमध्ये लोक जुगाड वापरून आपली कामे सोपे करण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यात काही वेळा न परवडणाऱ्या गोष्टीही देसी जुगाडच्या माध्यमातून तयार केल्या जातात. त्यामुळे हे जुगाड लोकांना फार आवडतात. सध्या असाच एक देसी जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे; ज्यात एका शाळकरी मुलाने जुगाड वापरून चक्क सायकलवर चालणारी वॉशिंग मशीन तयार केली आहे. त्यामुळे तरुणाच्या या जुगाडचे आता कौतुक होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत एका शाळकरी मुलाने मेहनत आणि बुद्धीच्या जोरावर एक अनोखी वॉशिंग मशीन तयार केली आहे; ज्यासाठी त्याला फारसा खर्च आलेला नाही. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक शाळकरी मुलगा वॉशिंग मशीनची चाचणी कशी घेत आहे? ही मशीन बनवण्यासाठी त्याने पाण्याचा ड्रम, मोटर आणि सायकलचा वापर केला आहे. त्याने सायकलची दोन्ही चाके काढून टाकली आहेत. त्यानंतर पुढच्या चाकाच्या जागी त्याने एक स्टँड जोडला आहे; तर मागच्या चाकाला एक छोटा ड्रम जोडला आहे. या वॉशिंग मशीनचे प्रात्यक्षिक दाखविताना तो हातातील एक मळका कपडा दाखवून, डिटर्जंट लिक्विट आणि पाण्याने भरलेल्या ड्रममध्ये टाकतो आणि सायकलच्या सीटवर बसून तो पायंडल मारू लागतो. जसा तो सायकलचे पायंडल मारणे सुरू करतो, तसा ड्रममधील मळका कपडाही फिरू लागतो. ही मशीनदेखील अगदी एखाद्या वॉशिंग मशीनप्रमाणेच काम करते. काही वेळातच ड्रममधील कपडा अगदी स्वच्छ होऊन बाहेर येतो. मुलाचा हा जुगाड पाहून सर्व जण त्याचे कौतुक करीत आहेत.
देसी जुगाडचा हा व्हिडीओ @storiesformemes नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे; ज्यावर लोक वेगवेगळ्या कमेंट्स करीत आहेत. एका युजरने लिहिलेय की, हा मुलगा भविष्यात नक्कीच महान वैज्ञानिक बनेल. त्याच वेळी दुसऱ्या एका युजरने लिहिलेय की, या व्यक्तीचा मेंदू खूप वेगवान आहे. भविष्यात हा आपल्या कुटुंबाचे नाव उंचावेल.