Student threatens principal: शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं गुरु-शिष्याप्रमाणे असतं. शिक्षकाकडून मिळालेली विद्येची शिदोरी आयुष्यभर जोपासण हे खरंतर विद्यार्थ्याचं काम. लहानपणी अनेकांनी शिक्षकांचा ओरडा खाल्ला असेल, मार खाल्ला असेल; पण कधीही शिक्षकांचा अनादर करणं आपल्याला शिकवलं जात नाही. पण, काही विद्यार्थी त्यांची मर्यादा ओलांडतात आणि शिक्षकांचा अनादर करतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक विद्यार्थी मुख्याध्यापकांना जीवे मारण्याची धमकी देताना दिसतोय.
विद्यार्थ्याने दिली जीवे मारण्याची धमकी
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये एक अकरावीतील विद्यार्थी चक्क मुख्याध्यापकांना धमकी देताना दिसत आहे. मुख्याधापकांनी विद्यार्थ्याचा फोन जप्त केल्यामुळे विद्यार्थ्याने हे पाऊल उचलल्याचं दिसतंय. या व्हिडीओत विद्यार्थी मुख्याध्यापकांना म्हणतो, “मी इथे शांत आहे, तुम्ही शाळेत आहात म्हणून मी तुम्हाला सोडून देतोय.” यावर मुख्याध्यापक विचारतात, “जर मी शाळेच्या बाहेर असलो असतो तर तू काय केलं असतंस?”
यावर संतप्त विद्यार्थी म्हणतो, “मी तुमच्या पोटात चाकू भोसकला असता, तुम्हाला माझ्या कॅरेक्टरबद्दल माहिती नसेल तर तुम्ही माझ्या मित्रांना याबद्दल विचारू शकता.”
पुढे तो म्हणतो, “तुम्ही व्हिडीओ रेकॉर्ड करताय, मला याचा काहीही फरक पडत नाही. मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही माझा मानसिक छळ करत आहात आणि तुम्ही त्याचा व्हिडीओही रेकॉर्ड करत आहात.”
“जर मला तुम्ही शाळेबाहेर भेटलात तर मी तुम्हाला मारून टाकेन, आता माझा फोन परत द्या”, अशी धमकी तो मुख्याध्यापकांना देतो.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @irshaan_insights या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “इयत्ता ११वीच्या विद्यार्थ्याने फोन हिसकावून घेतल्याने शाळेच्या मुख्याध्यापकांना दिली मारण्याची धमकी”, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल १.५ मिलियन व्ह्युज आले आहेत. यादरम्यान, ही घटना केरळमध्ये घडली असल्याचं वृत्त आहे.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “हे गांभीर्याने घेतले पाहिजे.., जर तो मुख्याध्यापकांना धमकावत असेल तर तो इतर विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालू शकतो.” तर दुसऱ्याने “त्याला तुरुंगात टाका” अशी कमेंट केली. एक जण कमेंट करत म्हणाला, “पोलिस ठाण्यामध्ये एक तासाचा मार त्याला आयुष्यभर शिस्तबद्ध ठेवेल.”