Students Fight Video : विद्यार्थ्यांना शिस्त लागावी यासाठी शाळेत पूर्वी शिक्षक छडीचा वापर करत होतो, जेणेकरून त्या छडीच्या धाकाने तरी विद्यार्थ्यांना शिस्त लागेल किंवा अभ्यास करतील; त्यामुळेच छडी लागे छम छम विद्या येई घम घम असे म्हटले जात होते. पण, आता छडी लागे छम छमचे दिवस उरले नाहीत. हसतखेळत शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थी आता शिक्षकांना न घाबरता मनाला वाटेल तसं बिनधास्त वागतात. यात पालकांचे लाड, शिक्षकांचे न ओरडणे आणि मोबाइल आणि इतर गोष्टींमुळे मुलं शाळा, कॉलेजसमध्ये काहीवेळा खूप आक्रमक किंवा हिंसक पद्धतीने वागताना दिसतात. त्यामुळे पूर्वी शिक्षकांबद्दल जी आदरयुक्त भीती होती ती आता उरलेली नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हाच व्हिडीओ पाहा ना, ज्यात विद्येच्या मंदिरात दोन विद्यार्थी बेशिस्तपणाच्या सर्व मर्यादा ओलांडताना दिसत आहेत. आता हा व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा अशा मुलांचं करायचं काय?

कॉलर पडकून चप्पल अन् बुक्क्यांनी केली एकमेकांना मारहाण (Students Fight Video)

हल्ली शिक्षकांनी मुलांना शिक्षा करणे सोडून दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये बेशिस्तपणा वाढताना दिसतोय. या व्हिडीओमध्येच पाहा ना, एका कोचिंग सेंटरच्या गणवेशातील दोन विद्यार्थी भरवर्गात कॉलर पडकून चप्पल अन् बुक्क्यांनी एकमेकांना मारहाण करत आहेत. यावेळी संपूर्ण वर्ग दोघांची मारामारी बघतोय, पण कोणी त्यांची भांडणं सोडवण्यासाठी पुढे आले नाही. दोघांच्या मारामारीचा व्हिडीओ पाहून लोक आता हा कोचिंग सेंटरचा वर्ग कमी आणि कुस्तीचा आखाडा जास्त दिसत असल्याचे म्हणत आहेत.

एक विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याला कॉलर पडकून थेट बाकावर पाडले अन्…

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कोचिंग सेंटरच्या एका वर्गात शिक्षक नसल्याने सर्व विद्यार्थी असेच गप्पा गोष्टी करत आपल्या बाकावर बसले होते, तर काही शिक्षकाच्या टेबलजवळ उभे होते. लंच टाईम असल्याने कदाचित हे विद्यार्थी इतक्या आरामात बसलेले दिसतायत. पण, याचदरम्यान दोन विद्यार्थ्यांमध्ये कोणत्यातरी कारणावरून भांडण होते. यावेळी हे भांडण इतके टोकाला पोहोचते की, दोघं एकमेकांवर हात उचलतात. व्हिडीओच्या सुरुवातीलाच भांडण करणारा एक विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्याला कॉलर पडकून थेट बाकावर पाडतो आणि पकडून ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण, दुसरा विद्यार्थी कसा बसा उठतो आणि रागात चप्पल घेऊन दे दणादण मारहाण करू लागतो.

यावेळी पहिला विद्यार्थीदेखील त्याला कानशिलात लगावतो. काही सेकंदात हे भांडण इतकं पेटतं की, दोघे एकमेकांना कसेही मारू लागतात. भांडता भांडता दुसऱ्या विद्यार्थ्याला पहिला विद्यार्थी बाकावर ढकलतो. यावेळी त्याचे मित्र त्याला पकडतात, पण तो कोणालाही न जुमानता पुन्हा चप्पलने पहिल्या विद्यार्थ्याला मारू लागतो. त्यानंतर पुन्हा आपल्या बाकावर बसतो आणि दोघांमधील भांडण थांबते. यावेळी दोघांमध्ये सुरू असलेले हे कडाक्याचे भांडण पाहण्यासाठी अनेक विद्यार्थी वर्गात गोळा झाले, पण एकही जण भांडण सोडवण्यासाठी पुढे आला नाही, सगळे बघ्याची भूमिका घेत त्यांची मारामारी आनंदाने पाहत होते. या व्हिडीओवरूनच पालकांना विद्यार्थी हल्ली किती आक्रमक पद्धतीने वागतात याची प्रचिती येईल.

मळकटलेली ऑफिस बॅग न धुता ‘या’ दोन ट्रिक्स वापरून लगेच करा स्वच्छ; बॅग दिसेल अगदी नव्यासारखी

व्हिडीओ पाहून संतापले युजर्स

हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे, जो आतापर्यंत अनेकांनी पाहिला आणि त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने लिहिले की, ‘क्लासरूममध्ये अशा प्रकारची भांडणे कशी काय होऊ शकतात?’, तर दुसऱ्याने लिहिले, ‘बाकीच्या विद्यार्थ्यांनी हे भांडण मूक प्रेक्षक म्हणून पाहण्यापेक्षा थांबवले पाहिजे होते.’ तिसऱ्या युजरने लिहिले की, ‘हे भांडण करण्याचे ठिकाण नाही, आयआयटी कोचिंगऐवजी त्यांना बॉक्सिंग कोचिंगमध्ये पाठवावे; हे इतक्या लहान वयात ज्या अचूकतेने एकमेकांना मारतायत, ते पाहता हे भारताला बॉक्सिंगमध्ये पदक नक्कीच मिळवून देऊ शकतात. ‘ चौथ्या युजरने लिहिले की, ‘कोचिंग सेंटरमधील कर्मचारी, शिक्षक आणि व्यवस्थापन यावेळी काय करत होते? ते फक्त फी गोळा करायला आहेत का? त्यांच्या देखरेखीखाली हे घडायला नको होते. ‘ अशाप्रकारे युजर्स या घटनेवरून कोचिंग सेंटरवर ताशेरे ओढत आहेत. तसेच विद्यार्थ्यांचे असे वागणे अत्यंत चुकीचे असल्याचे म्हणत पालकांना दोष देत आहेत.