साऱ्या सुख-सोयींनी परीपूर्ण असलेल्या वातावरणात आपण जगतो पण आपल्याच देशात राहणारे असेही काही लोक आहेत जे मुलभूत सुख सोयींपासून पूर्णपणे वंचित आहेत. शहरी भागातील सधन कुटुंबात जन्मलेल्या मुलांना शाळेत नेण्यासाठी अगदी घरापर्यंत बस येते मात्र आसाम मधल्या सुती गावात राहणारी मुलं मात्र शहरी मुलांइतकी नशिबवान नाहीत. शाळेत जाण्यासाठी दरदिवशी या चिमुकल्यांना आपला जीव धोक्यात घालावा लागतो. कारण शाळा आणि गाव यांच्यामधून नदी वाहते. नदीवर अद्यापही पूल बांधलेला नाही. त्यामुळे टोपलीएवढ्या अॅल्युमिनअमच्या भांड्यात बसून ही छोटी मुलं नदी पार करतात.

शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी मुलांना करावा लागलेला संघर्ष नित्याचा असला तरी हे दृश्य पाहून कोणाचंही काळीज पिळवटून निघालं असतं. लहानश्या भांड्यात बसून ही मुलं हातानंचं हे भांडं वल्हवत नदीपलीकडे जातात. त्यांची धडपड अत्यंत त्रासदायक अशीच आहे पण शिकण्यासाठी कोणतीही जोखीम घ्यायला ही मुलं तयार होतात.

या नदी परिसरात कोणतीही मोठी बोट नाही त्यामुळे मुलं दुर्दैवानं या पर्यायाचा वापर करतात. यापूर्वी केळीच्या खोडापासून तयार करण्यात आलेली लहान बोट वापरून मुलं नदी पार करत होते अशी माहिती या शाळेचे शिक्षक जे. दास यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
मुलं अशाप्रकारे जीव धोक्यात घालून शाळेत जातात. या परिसरात एकही पूल नाही ही बाब खरंच लज्जास्पद आहे. पूल नसतानाही अशा भागात सरकारी शाळा बांधलीच का ?असा सवाल भाजप आमदार प्रमोद बोर्रठाकूर यांनी केला आहे. यापुढे नदी पार करण्यासाठी मुलांना बोट पुरवण्यात येईल तसेच शक्य असेल तर शाळा दुसऱ्या एका सुरक्षित ठिकाणी बांधण्याचा प्रयत्न आम्ही करू असं आश्वासन त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिलं.

Story img Loader