Stunt Viral Video : सोशल मीडियावर स्टंटबाजीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यामध्ये लोक रस्त्यावर वाहनांचा वापर करून धोकादायक स्टंटबाजी करताना दिसतात. त्यात कधी कोण वेगाने बाईक चालवताना, तर कोण कधी कारच्या बॉनेटवर बसून जीवघेणी स्टंटबाजी करताना दिसतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

व्हिडीओत काही तरुण ऑटोरिक्षामधून प्रवास करताना दिसतायत. त्यामध्ये रस्ता सुरक्षा नियमांचे खुलेआमपणे उल्लंघन करीत आहेत. व्हिडीओमध्ये एक तरुण वेगाने धावणाऱ्या ऑटोरिक्षाच्या छतावर बसून स्टंटबाजी करताना दिसतोय; तर दुसरा तरुण रिक्षाच्या बाजूला लटकून धोकादायक स्टंट करीत आहे.

हा व्हिडीओ नोएडाच्या स्टेशन सेक्टर-१२६ मधील सेक्टर-९४ मधील असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडीओत असे दिसून येते की, हायवेवरून अनेक मोठी वाहने जात आहेत आणि त्याचदरम्यान एक रिक्षाचालक त्याचे वाहन वेगाने पळवताना दिसतोय.

रिक्षामध्ये मोठ्या आवाजात गाणी वाजवली जात आहेत, यावेळी एक तरुण रिक्षाच्या छतावर बसून, त्यावर नाचत आहे; तर दुसरा बाजूला लटकून धोकादायक स्टंटबाजी करतोय. यावेळी चुकूनही दोघांचा तोल गेला असता, तर ते मोठ्या अपघाताचे बळी ठरू शकले असते. धक्कादायक बाब म्हणजे ते हा सर्व प्रकार निर्लज्जपणे अर्धनग्न अवस्थेत करीत होते. जीवाची पर्वा न करता, दोघेही रस्त्यावर धोकादायक स्टंट करताना आजूबाजूने जाणारे चालक मात्र त्यांना रोखण्याऐवजी ‘तमाशा’ बघून पुढे जात होते.

रिक्षावर तरुणांची स्टंटबाजी व्हिडीओ (फोटो – @News1IndiaTweet / x)

या जीवघेण्या स्टंटबाजीचा व्हिडीओ @News1IndiaTweet नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच, नोएडा वाहतूक पोलिसांनी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल रिक्षाचालकाला 33,500 रुपयांचा दंड ठोठावला आणि संबंधित कलमांखाली कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. नोएडा वाहतूक पोलिसांनी पोस्टच्या कमेंटमध्ये ऑटोचालकावर केलेल्या कारवाईची माहिती दिली.