Viral video: भावी प्रशासक घडविणाऱ्या स्पर्धा परीक्षांकडे वळण्याचं तरुणांचं प्रमाण गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. प्रशासकीय अधिकारीपद आणि त्यातून लोकांसाठी काम करण्याची संधी मिळत असल्याने शिक्षणाकडे गांभीर्याने बघणारी मुलं या क्षेत्राकडे वळत आहेत. मात्र या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी बहुसंख्येने ग्रामीण क्षेत्रातून शहरात येणाऱ्या मुलांना नेमकं कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं? स्वत:ला या कठीण अभ्यासासाठी तयार करत, उत्तीर्ण होणं या सगळय़ामुळे अनेकदा या मुलांवर ताण येत राहतो.

अपमानाचा प्रत्येकालाच सामना कधी ना कधी करावा लागतो. कधी आपली चूक नसताना तर कधी आपली चूक झाली म्हणून अपमान सहन करावा लागतो. त्या क्षणी जरी अपमान गिळत असलो तरी झालेला अपमान कुणीही विसरत नाही. काही जण चुकीच्या मार्गाने याचा बदला घेतात, मात्र यश संपादन करणं हाच सगळ्यात मोठा बदला आहे; हे तर साऱ्यांनाच मान्य असेल. मात्र, फार कमी लोक असे असतात, जे आपल्या यशातून अपमानाचा वचपा काढतात. मात्र यातूनही कितीतरी वेळा अपयश पचवून काहीजण यश खेचून आणतात.

दरम्यान असाच एक तरुण सर्व अडचणींवर मात करुन अखेर अधिकारी झाला. यावेळी त्यानं ही बातमी पहिल्यांदा आईला दिली त्यावेळी नेमकं काय घडलं हे हा तरुण सांगत आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल. देवेंद्र रत्ना अप्पाजी शेलार असं या तरुणाचं नाव असून आता हा तरुण पीएसआय झाला आहे. यावेळी तो त्याच्या संघर्षाची कहाणी सांगत आहे. तो सांगतो, रिझल्ट लागला पीएसआय झालो तेव्हा सगळ्यात आधी आईला फोन केला कारण आईची प्रतिक्रिया मला पाहायची होती.. यावेळी आई आणि मी फक्त सुरुवातीला काही वेळ रडत होतो. नंतर मी आईला सांगितलं,”आई आपला २७ वर्षाचा वनवास आज संपला आहे तू आता फक्त आनंदी राहा”

पाहा व्हिडीओ

स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होणे, पोलिसी गोल टोपी मिरवणे किंवा रुबाबात गाडीत फिरण्याचे स्वप्न ठेवणे काही चूक नाही. मात्र, अनेकदा असे होते की, आपण आपली क्षमता आणि गुणवत्ता याचा ताळमेळ न बसवता या फंदात पडून आपले आयुष्य वाया घालवतो. काहींना यश मिळते. मात्र, ते खूप मोजके असतात. तर, अनेक गुणवत्तापूर्ण मंडळी आपला महत्वाचा वेळ या चक्रव्यूहात खर्ची घालतात. माध्यमांच्या बातम्या आणि सामाजिक स्टेट्स यामुळे हे चक्रव्यूह आणखी घट्ट होत आहे. आपण स्वतः निर्णय घेतला असेल व मेहनत करण्याची तयारी ठेवावी लागेल. संयम खुप लागतो. कारण शेवटी ही स्पर्धा परीक्षा आहे जो टिकेल तोच जिंकेल.