Viral video: अपमानाचा प्रत्येकालाच सामना कधी ना कधी करावा लागतो. कधी आपली चूक नसताना तर कधी आपली चूक झाली म्हणून अपमान सहन करावा लागतो. त्या क्षणी जरी अपमान गिळत असलो तरी झालेला अपमान कुणीही विसरत नाही. काही जण चुकीच्या मार्गाने याचा बदला घेतात, मात्र यश संपादन करणं हाच सगळ्यात मोठा बदला आहे; हे तर साऱ्यांनाच मान्य असेल. मात्र, फार कमी लोक असे असतात, जे आपल्या यशातून अपमानाचा वचपा काढतात.
संघर्षाच्या काळात प्रत्येकाला निःस्वार्थी सोबती हवा असतो. या काळात अशा माणसाची खरी गरज असते, जो आपल्या सोबत उभा राहील. मात्र, प्रत्येकालाच संघर्षाच्या काळात संयमाने सोबत उभा राहणारा जोडीदार, सोबती मिळतोच असं नाही. असंच काहीसं या तरुणाच्या बाबतीत झालं आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेत नापास झाल्यानंतर त्याची प्रेयसी त्याला सोडून गेली. मात्र, पठ्ठ्यानं खचून न जाता जोमानं अभ्यास केला अन् पुढच्याच वर्षी पोस्ट काढत प्रेयसीला करून दाखवलं. या तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून तुम्हीही या तरुणाचं कौतुक कराल.
प्रेयसी सोडून गेली किंवा प्रियकर सोडून गेला की लोक डिप्रेशनमध्ये जातात. आता आयुष्यच थांबलं असं त्यांना वाटतं. ज्यात त्यांची काही चूक नसते, तर त्यांना त्या व्यक्तीची इतकी सवय झालेली असते की आता एकट्याने जगणं नकोसं होतं. मात्र, अनेक जण यावरही तोडगा काढतात आणि जबरदस्त असा कमबॅक करतात. असाच कमबॅक या तरुणानं केला अन् त्या तरुणीला तिच्या निर्णयाचा पश्चाताप होईल अशी वेळ आणली.
नापास झाल्यावर प्रेयसी सोडून गेली अन्…
आता तुम्ही म्हणाल असं काय केलं यानं? तर पठ्ठ्यानं राज्यसेवा मुख्य परीक्षा नापास झाल्यावर त्याची प्रेयसी त्याला सोडून गेली, पण पुढच्या वर्षी पोस्ट काढून तिच्या घरासमोर ७५ तोफा लावल्या. तरुण स्वत:च हा किस्सा सांगत असून त्याचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय. “परीक्षेची तयारी करताना प्रेमात पडलो अन् निकाल लागल्यावर नापास झालो, तेव्हा ती पण सोडून गेली. मग लक्षात आलं की, पास झालो तरच कोणीही आपल्यासोबत राहणार; म्हणून एक वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीनं अभ्यास केला. पुढच्या वर्षी पास झालो आणि जी सोडून गेली होती तिच्या दरवाजात ७५ तोफा वाजवून दिल्या”, असं तो सांगतो.
पाहा व्हिडीओ
https://www.instagram.com/reel/C76Vut9S4It/?igsh=M2wxMmY2ZHNvMG16
हेही वाचा >> “वेळ बदलते आणि कर्तव्य पण बदलतात” थकलेल्या वडिलांचा लेक बनला आधार; पक्षांचा ‘हा’ VIDEO विचार करायला भाग पाडेल
हा व्हिडीओ 74_motivation_khaki या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून व्हिडीओला नेटकरी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत आहेत. नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही व्हिडीओवर देत आहेत.