UPSC Success story: भावी प्रशासक घडविणाऱ्या स्पर्धा परीक्षांकडे वळण्याचं तरुणांचं प्रमाण गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. प्रशासकीय अधिकारीपद आणि त्यातून लोकांसाठी काम करण्याची संधी मिळत असल्याने शिक्षणाकडे गांभीर्याने बघणारी मुलं या क्षेत्राकडे वळत आहेत. मात्र, या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी बहुसंख्येने ग्रामीण क्षेत्रातून शहरात येणाऱ्या मुलांना नेमकं कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं? स्वत:ला या कठीण अभ्यासासाठी तयार करत, उत्तीर्ण होणं या सगळ्यांमुळे अनेकदा या मुलांवर ताण येत राहतो.
मात्र, यातूनही कितीतरी वेळा अपयश पचवून काही जण यश खेचून आणतात. दरम्यान, असाच एक फोटो व्हायरल झाला आहे. पोलिस ओंकार अनिता अनिल गुजर यांनी रिझल्ट लागल्यानंतर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवरून अंदाज येतो की, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी मुलं किती झोकून देऊन अभ्यास करतात. एवढचं नाही तर ज्या ठिकाणाहून आपण वर आलोय त्याला कधी विसरायचं नसतं हेच ओंकार गुजर यांनी यातून दाखवलं आहे. ओंकार गुजर हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना एका लायब्ररीत दीड फुटाच्या डेस्कवर बसायचे. जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा या डेस्कचे आभार मानण्यासाठी पळत या ठिकाणी आले, तेव्हाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून ओंकार गुजर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी जे कॅप्शन लिहिलं आहे, ते वाचून प्रत्येक जण भारावून गेला आहे. ते कॅप्शनमध्ये लिहितात, “शेवटचा नमस्कार माझ्या सीटला, जिने माझं आयुष्य बदलून टाकलं.. माझ्या मेहनतीची साक्ष सांगणारी, हारू नको लढत राहा असं सांगणारी माझी सीट; म्हणायला गेलं तर ३×३ चा टेबल अन् म्हणायला गेलं तर आयुष्यभराची शिदोरी. सुख, दुःख, हार,जीत सगळं काही तुझ्याच साक्षीने.. छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्यापासून एकच लायब्ररी अन् एकच सीट. सीटनंबर ७२ जे काही आहे ते फक्त तुझ्यामुळेच. बँकिंगचे स्वप्न घेऊन संभाजीनगरला आलो होतो, पण महाराष्ट्र शासनाच्या एक नाही तर दोन दोन पोस्ट मिळाल्या.. कृषी सहाय्यक अधिकारी (कृषी सेवक), ग्रामविकास अधिकारी (ग्राम सेवक) दिवसाची सुरुवात अन् रात्रीचा शेवट तुझ्यापासूनच होता. अजूनही खूप आहे आयुष्यात, ही तर सुरुवात आहे. जसं माझं आयुष्य बदलून टाकलंस, तसंच सगळ्यांचं बदल.. शेवटी येवढंच बोलेन, अखेरचा हा तुला दंडवत..
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> आईशिवाय घर अपुरं अन् बापाशिवाय आयुष्य…कुटुंबातून बाप गेल्यावर काय परिस्थिती होते बघाच; VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी
हा व्हिडीओ ओंकार गुजर यांनी prince_omi_07 या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. मेहनत करण्याची तयारी व संयम ठेवावा लागतो, कारण शेवटी ही स्पर्धा परीक्षा आहे, जो टिकेल तोच जिंकेल, असे त्यांनी या व्हिडीओत म्हटले आहे.