Ayodhya Ram Mandir Opening Ceremony: अखेर तो क्षण आला… आज अयोध्येत श्रीराम यांच्या मंदिराचे उद्घाटन होणार. सर्व राम भक्त अनेक दिवसांपासून या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. कारण ५०० वर्षांची प्रतीक्षा आज अंतिम टप्प्यात आली आहे. श्रीराम मंदिरात १२ वाजता प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्याला सुरुवात होईल, तर या खास दिनाचे औचित्य साधून प्रसिद्ध वाळू कलाकार यांनी त्यांची कला दाखवत एक वाळूशिल्प साकारलं आहे.
अयोध्येच्या शरयू नदीच्या किनाऱ्यावर वाळूत भगवान रामाची दुर्मीळ कलाकृती कोरण्यात आली आहे. या कलाकृतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ श्रीराम यांना वंदन करताना दाखविले आहेत. तसेच या कलाकृतीला फुलांनी सजावट केली आहे आणि श्रीराम मंदिरसुद्धा वाळूत रेखाटले आहे. त्याचबरोबर खास गोष्ट अशी की, श्रीराम मंदिर रेखाटल्यानंतर त्याची सजावट म्हणून त्यावर आणखीन ५०० छोटी छोटी श्रीराम मंदिरे कोरण्यात आली आहेत. एकदा पाहाच वाळूतील श्रीरामाची खास कलाकृती…
हेही वाचा…Ayodhya Ram Mandir: अद्भुत ! गाडीवर साकारली थेट श्री राम मंदिराची प्रतिकृती; VIDEO एकदा बघाच…
पोस्ट नक्की बघा :
वाळू कलाकार सुदर्शन पटनायक आणि त्यांच्या सात विद्यार्थ्यांनी मिळून ही खास कलाकृती सादर केली आहे. तसेच ही खास कलाकृती सादर करण्यास त्यांना दोन दिवसांचा कालावधी लागला आहे. ५०० वर्षांच्या विश्वासाची प्रतीक्षा संपुष्टात आली म्हणून कलाकृतीत ५०० छोटी छोटी मंदिरे कोरण्यात आली आहेत. वाळूशिल्प सादर करत सुदर्शन पटनायक म्हणाले, आपण सर्वांनी माननीय पंतप्रधानांच्या नम्र विनंतीला प्रतिसाद देऊया आणि या शुभ प्रसंगी घरे दिव्यांनी उजळून टाकूयात. जय श्रीराम! ; असे कॅप्शनमध्ये त्यांनी सर्व राम भक्तांना आवाहन केलं आहे.
तसेच सुदर्शन पटनायक यांनी आणखीन एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या अद्भुत कलाकृतीसमोर उभे राहून सेल्फीसुद्धा घेताना आणि सुदर्शन पटनायक यांच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर सर्व फोटो आणि व्हिडीओ सुदर्शन पटनायक यांच्या @sudarsansand या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आले आहेत.