सोमवारी एका कार्यक्रमानिमित्त सांगलीमध्ये आलेल्या ‘इन्फोसिस फाउंडेशन’च्या प्रमुख आणि आपल्या समाजकार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सुधा मूर्ती यांनी शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांची भेट घेतली. यावेळी सुधा मूर्ती संभाजी भिडेंच्या पायाही पडल्या. मात्र ही भेट इच्छिक नव्हती असा धक्कादायक खुलासा कार्यक्रमाचे आयोजकांनी केला आहे. संभाजी भिडेंनी सुधा मूर्तींना भेटण्याचा हट्ट केला आणि त्यानंतर अगदी हॉटेलपासून कार्यक्रमाच्या हॉलपर्यंत सगळीकडे त्यांचे कार्यकर्ते सुधा मूर्तींचा पाठलाग करत होते असा दावा आयोजकांपैकी एक असेलल्या योजना यादव यांनी फेसबुक पोस्टमधून केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेहता पब्लिकेशनच्या योजना यादव यांनी फेसबुकवरुन सुधा मूर्ती यांची भेट संभाजी भिडे आणि त्यांच्या समर्थकांनी अगदी हट्ट करुन घेतल्याचं म्हटलं आहे. तसेच संभाजी भिडे हे वयस्कर वाटल्याने सुधा मूर्ती त्यांच्या पाया पडल्याचंही या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. याशिवाय सुधा मूर्ती यांनी या साऱ्या प्रकारानंतर पुन्हा हॉटेलवर जाताना काय म्हटलं याबद्दलचा खुलासाही योजना यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे. योजना यांनी पोस्टमध्ये काय लिहिलं आहे वाचूयात त्यांच्याच शब्दांमध्ये…

ही हद्द झाली. अशक्य हद्द. सुधा मूर्तींच्या कार्यक्रमाचं नियोजन सुरू होतं. तेव्हापासून दिवसाला भिडेंकडून दोन-तीन फोन येत होते. सुधाताईंनी आधीच कुणाला भेटणार नसल्याचं सांगितलं होतं. पण हे महाशय हट्टाला पेटले होते. आम्ही ऑफिसवर फोन येत होते तेव्हाच नाही म्हणून सांगितलं होतं. पण त्यांनी त्यांचं हॉटेल शोधलं. सुधा मूर्ती यायच्या आधीच हे तिथं पोहोचले. परत गेले. सुधा मूर्ती दुपारी हॉटेलवर आल्या आणि रूमवर विश्रांतीला गेल्या. संध्याकाळी पाचला कार्यक्रम होता. हे तीन वाजल्यापासून लॉबीमध्ये ठाण मांडून बसले. शेवटी सुधाताईना मी मागच्या दरवाज्याने बाहेर काढलं. त्या गाडीत बसताना भिडेंचे कार्यकर्ते पळत आले, तर तिथून आम्हाला अक्षरशः गाडी दामटायला लागली. गाडीत त्या मला म्हणाल्या, कोण आहे ही व्यक्ती? त्यांना मी परिचय सांगितला. तर त्या थोड्या त्रासल्याच होत्या. म्हणाल्या, यांना मला भेटून काय करायचं आहे? ते त्यावेळी आम्हालाही माहीत नव्हतं.

आम्ही हॉलवर पोहोचलो. कार्यक्रम वेळेत सुरू झाला.

आमचा नेहमीप्रमाणे कार्यक्रम सुरळीत सुरू होता. तिकडे भिडेंचे कार्यकर्ते हॉल बाहेर जमा व्हायला लागले. तस पोलिसांना टेन्शन येऊ लागलं. पोलिसांना फक्त काही अघटित घडू नये म्हणून काळजी घ्यायची होती. म्हणून ते आमच्या मागे लागले की तुम्ही दोन मिनिट भिडेना त्यांना भेटू द्या. कार्यक्रमाच्या मध्यात वाचकांना सोडून सुधा ताईंना उठायचं नव्हतं. तरी त्या नाईलाजाने उठल्या. आणि वैतागून भेटायला गेल्या. त्याआधी त्यांनी मला त्यांचं वय विचारलं फक्त. फार वयस्कर असतील तर त्या नमस्कार करतात म्हणून. त्यांना पाहिल्यावर ते त्यांना फार म्हातारे वाटले म्हणून त्यांनी त्यांना नमस्कार केला.

सुधाताईंनी मला हॉटेलवर परत जाते वेळी सांगितलं की भिडे त्यांना म्हणत होते की त्यांना दीड तास बोलायचं आहे. सुधाताई म्हणाल्या माझ्याकडे दीड मिनिटापेक्षा जास्त वेळ नाही.

नंतर आमची सुधाताईंचा फोटो वापरून कसा प्रोपौगंडा होईल यावरही बोललो. सुधाताई म्हणत होत्या, ‘ योजना, अग अशा लोकांशी आपण काय बोलणार. त्यांना भेटायचं असेल आणि आपल्याला शक्य असेल तर भेटून घ्यायचं. आणि सोडून द्यायचं’

आणि एएनआय सारख्या मीडियाने ही अशी बातमी देणं म्हणजे सगळ्यात दुर्दैव आहे.

या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करुन आपली मतं मांडली असून त्यापैकी बऱ्याच जणांनी अशाप्रकारची वागणूक सुधा मूर्तींसारख्या प्रतिष्ठित व्यक्तीला देणं योग्य नसल्याचं मत व्यक्त केलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sudha murthy sambhaji bhide meeting in sangli shocking revelation by organiszer mehta publication yojana yadav scsg