असं म्हणतात संगीत आणि कलेला कधीही धर्म, देश यासारख्या बंधनात अडकून ठेवायचे नसते, पण दुर्देव असे की आपल्या देशात असेही लोक आहेत की त्यांना या गोष्टी कळत नाही. कर्नाटकमध्येही असेच झाले, एका कन्नड रिअॅलिटी शोमध्ये भजन गायले म्हणून एका मुस्लिल स्पर्धकावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
सुहाना सईद नावाच्या तरुणीने एका रिअॅलिटी कार्यक्रमात भजन गायले होते. आपल्या सुरेल आवाजाने तिने जमलेल्या प्रेक्षकांची मने जिंकली पण नंतर मात्र सोशल मीडियावर तिच्यावर मोठ्या प्रमाणत टीका करायला काही समाजकंटकांनी सुरूवात केली. मंगलोर मुस्लिम या फेसबुक पेजवरून तिच्यावर टीका करण्यात आली आहे. पुरुषांसमोर गाणं गाऊन तिने मुस्मिल समाजाची मान शरमेने खाली घालायला लावली आहे. भजन गाऊन आपण यशाचा डोंगर गाठला असे तिला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. त्यापेक्षा सहा महिन्यांत तिने कुराणचे पठन केले असते तर तिला नक्कीच चांगले यश मिळाले असते अशा भाषेत तिच्यावर टीका करण्यात आली आहे.
हे समाजकंटक फक्त तिच्यावरच घसरले नाही तर त्यांनी तिच्या कुटुंबियांचा देखील अपमान केला. पुरुषांसमोर आपल्या मुलीला गायला लावणा-या या आईवडिलांना कधीच स्वर्गात जागा मिळणार नाही असेही म्हटले आहे. पण अनेकांनी सुहानाची बाजू घेतली आहे. सुहानाने भजन गाऊन एकतेचे उदाहरण ठेवले आहे. तेव्हा गाणं गायल्याने कोणत्याही समजाच्या भावान दुखावल्या गेल्या नसल्याचे अनेकांनी म्हटले आहे. पण सुहानाने मात्र सध्यातरी यावर उत्तर देणं टाळलं.