Sunil Gavaskar Post For Sachin Tendulkar: भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी मंगळवार, २८ नोव्हेंबर रोजी गुजरातमधील सुरत येथील एका रेल्वे स्थानकाचा फोटो शेअर करत आनंद उत्साह व्यक्त केला आहे. या फोटोचा सचिन तेंडुलकरशी संबंध जोडत गावसकर यांनी पोस्ट केली होती. तुम्ही पोस्टमध्ये पाहू शकता गावसकर यांनी गुजरातच्या सचिन रेल्वे स्थानकाचा फोटो शेअर केला आहे. यावरून त्यांनी सचिन तेंडुलकरला टॅग करत पोस्ट लिहिली आहे. तुमच्या माहितीसाठी सचिन हे गुजरातच्या सुरतमधील एक छोटे रेल्वे स्थानक आहे. अवघ्या तीन प्लॅटफॉर्मच्या या स्थाकानातुन मुंबई-अहमदाबाद-जयपूर-दिल्ली या मार्गावरील ट्रेन प्रवास करतात.
सुनील गावसकर यांनी पोस्टला कॅप्शन देत म्हटले की, “गेल्या शतकातील लोकांची दूरदृष्टी कमाल होती. त्यांनी तेव्हाच सुरतजवळच्या रेल्वे स्टेशनला सर्वकालीन महान खेळाडूंपैकी एक आणि माझा आवडता क्रिकेटर व आवडत्या व्यक्तीचे नाव दिले. ” दरम्यान गावसकर यांच्या पोस्टवर उत्तर देताना सचिनने “तुमचे शब्द माझ्यासाठी खूप खास आहेत गावसकर सर, आणि सचिन स्थानकावरील ‘सनी’ वातावरण पाहून खूप छान वाटलं.” अशी कमेंट केली आहे. सुनील गावसकर यांचे ‘सनी’ हे टोपणनाव सुद्धा प्रसिद्ध होते.
सचिन तेंडुलकर प्रतिक्रिया
गावसकर हे स्वतः कसोटी सामन्यांमध्ये १०,००० धावांचा टप्पा गाठणारे पहिले क्रिकेटपटू होते. तर तेंडुलकरने कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. निवृत्तीनंतर, गावसकर समालोचक म्हणून काम करत आहेत, तर तेंडुलकर सध्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) फ्रँचायझी मुंबई इंडियन्स (MI) संघ मार्गदर्शक म्हणून काम करत आहे.
सचिन तेंडुलकरने सुद्धा वेळोवेळी काही मुलाखतींमध्ये गावसकर यांच्या नावाचा विशेष उल्लेख केला आहे. क्रिकेट. कॉमशी एकदा बोलताना सचिन म्हणाला होता की, “क्रिकेटच्या करिअरमध्ये मला दोन गोष्टींची खंत वाटते. ती म्हणजे मला सुनील गावसकर आणि व्हिव्हियन रिचर्ड्सबरोबर खेळण्याची संधी मिळाली नाही. लहानपणी क्रिकेट बघताना गावसकर म्हणजे माझ्यासाठी फलंदाजीचा आदर्श होते, मी संघाचा भाग होण्याच्या काही वर्ष आधीच गावसकर यांनी निवृत्ती घेतली होती त्यामुळे त्यांच्याबरोबर खेळण्याचे भाग्य मला लाभले नाही.”
सचिन तेंडुलकर व गावसकर यांचे धावांचे रेकॉर्ड्स
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे, त्याने ६६४ सामन्यांमध्ये १०० शतकांसह ३४,३५७ धावा केल्या आहेत. दरम्यान, गावस्कर आणि रिचर्ड्स यांनी अनुक्रमे १३,२१४ (२३३ सामने) आणि १२,१९७ धावा (३१० सामने) पूर्ण केल्या आहेत. एकदिवसीय विश्वचषकात रिचर्ड्सने स्पर्धेच्या १९७५ आणि १९७९ च्या स्पर्धा जिंकण्यात मोलाचे योगदान दिले होते. तर गावसकर आणि तेंडुलकरला अनुक्रमे १९८३ आणि २०११ मध्ये आयसीसी विश्वचषक संघात खेळताना जिंकता आला होता.