Sunita Williams: अंतराळवीर सुनीता विल्यम्स या नऊ महिने अंतराळात घालवल्यानंतर सुरक्षितपणे पृथ्वीवर परतल्या आहेत. भारतीय वेळेनुसार पहाटे ३.३० च्या सुमारास त्यांचे स्पेस कॅप्सूल मेक्सिकोच्या आखातात उतरले. सुनीता विल्यम्स व त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे केवळ आठ दिवसांच्या अंतराळ मोहिमेवर गेले होते. आंतरराष्ट्रीय आंतराळ स्थानकात दोघेही आठ दिवस संशोधन करून परतणार होते. मात्र, त्यांच्या बोईंग स्टारलायनर या स्पेसक्राफ्टमधील तांत्रिक बिघाडामुळे त्यांना २८६ दिवस आंतरराष्ट्रीय आंतराळ स्थानकातच घालवावे लागले. मात्र पुन्हा पृथ्वीवर परतल्यानंतर संपूर्ण जगभरात आनंदाचे वातावरण आहे.

विल्यम्स आणि विल्मोर ५ जून २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचले. ८ दिवसांच्या मोहिमेचे उद्दिष्ट अनपेक्षित तांत्रिक बिघाडांमुळे नऊ महिन्यांच्या मुक्कामात वाढले. दरम्यान अंतराळातून परतल्यानंतर समुद्रात उतरलेल्या कॅप्सूलभोवती नासाच्या कॅमेऱ्यांनी एक विलक्षण गोष्ट टिपली. कॅप्सूलच्या अवतीभवती काहीतरी वेगळे हलताना, पाणी हलताना दिसले, त्यामुळे वैज्ञानिकांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र नंतर नासाच्या कॅमेऱ्यांनी झूम इन केले अन् समजले की काहीही वेगळे नव्हते, तर डॉल्फिन्सचा एक मोठा समूह होता. त्यावेळी एक सुंदर दृश्य पाहायला मिळाले. जेव्हा सुनीता विल्यम्स आणि तिच्या साथीदारांना कॅप्सूलमधून बाहेर काढले जात होते, तेव्हा कॅप्सूलभोवती अनेक डॉल्फिन पाहायला मिळाले. यादरम्यानचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

पाण्यात कॅप्सूलभोवती वर्तुळात डॉल्फिन पोहताना दिसले. जणू ते “सुनीता आणि बुच यांचे स्वागत आहे” असेच म्हणत होते.

पाहा व्हिडीओ

दरम्यान, विल्यम्स व विल्मोर यांना परत आणण्यासाठी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने स्पेसएक्स या खासगी आंतराळ संशोधन कंपनीच्या मदतीने मोहीम आखली. स्पेसएक्सच्या अवकाशयानाने १४ मार्च रोजी दोघांना परत आणण्यासाठी उड्डाण केलं आणि आज पहाटे ते यान दोन्ही अंतराळवीरांना घेऊन परतलं. 

नासाने पुष्टी केली की, दोन्ही अंतराळवीर पृथ्वीवर परतल्यानंतर पूर्णपणे सुरक्षित आहेत. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे आणि अंतराळवीरांच्या पथकातील व्यक्तींची प्रकृती चांगली असली तरी त्यांना पृथ्वीवरील सामान्य जीवनाशी पूर्णपणे जुळवून घेण्यासाठी थोडा वेळ लागेल. खबरदारी म्हणून पुढील काही आठवडे नासाचे वैद्यकीय पथक त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवेल.

Story img Loader