Atal Setu Viral Video : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच देशातील सर्वात लांब अटल सेतूचे (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) उद्घाटन केले, उद्धाटन झाल्यापासून हा पूल पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. या मोठ्या पुलावर लोक आपल्या गाड्या थांबवून सेल्फी घेताना दिसत आहेत. यातच अटल सेतूवरील स्पोर्ट्स कार्सचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कोणत्याही कारवाईची भीती न बाळगता एकाच वेळी १० हून अधिक स्पोर्ट्स कार्सनी अटल सेतूच्या एका बाजूला ट्रॅफिक जाम करून ठेवले होते, ज्यामुळे संबंधित लोकांवर आता संताप व्यक्त केला जात आहे.
मुंबई ते नवी मुंबई हे अंतर अवघ्या २० मिनिटांत पार करण्यासाठी अटल सेतू बांधण्यात आला. मात्र, अशा काही लोकांमुळे आता अटल सेतूवरून प्रवास करणे डोकेदुखीचे कारण बनत आहे. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एकाच वेळी १० हून अधिक स्पोर्ट्स कार अटल सेतूवर थांबल्या आहेत. काही कार्स रस्त्याच्या कडेला तर काही रस्त्याच्या मधोमध धीम्या गतीने जात आहेत. अशाने इतर वाहनचालकांनाही फुकटचा मनस्ताप सहन करावा लागतोय. इतकेच नाही तर स्पोर्टस कार्समधून आलेले काही जण तर चक्क रस्त्याच्या मधोमध उभे राहून व्हिडीओ आणि फोटो शूट करत आहेत, @autoluxuryinindia नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
दे दणादण! लग्नसमारंभात तुफान राडा, एकमेकांना फेकून मारल्या खुर्च्या; पाहा Video
देशातील या सर्वात लांब पुलावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वाहतूक पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई सुरू केली आहे. आत्तापर्यंत अनेक चालकांवर कारवाईदेखील झाली. मात्र, त्यानंतरही काही कारचालक स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करत आहेत.
काही दिवसांपूर्वीच या पुलावर शेकडो प्रवासी आपली वाहने थांबवून सेल्फी घेताना दिसले, तर काही लोक पुलाची रेलिंग ओलांडतानाही दिसले. सेल्फीप्रेमी प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे पुलाचे बांधकाम करणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) चिंता वाढली आहे.