देशाच्या राजकारणात स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या पवारांचा वारसा पुढे नेणाऱ्या कन्या सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस काल होता. त्यानिमित्ताने सकाळपासूनच देशभरातील अनेक नेते, पदाधिकाऱ्यांनी कॉल, मेसेजसच्या माध्यमातून सुप्रिया सुळेंना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबासोबत वाढदिवसा निमित्त छोटं सेलिब्रेशन देखील केलं.
खासदार सुप्रिया सुळेंनी या सेलिब्रेशनचे फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर देखील टाकले होते. त्यामध्ये सुप्रिया सुळे या आई प्रतिभा पवार आणि वडिल शरद पवार यांच्यासोबत केक कापताना दिसत होत्या. त्यानंतर सुप्रिया सुळेंनी आज इन्स्टाग्रामावर एका केकचा फोटो शेअर करत आपल्या लेकीचे कौतुक केले आहे. मुलगी रेवतीच्या या ‘खास गिफ्ट’ने सुप्रिया सुळे भारावून गेल्या. त्यांनी फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
“हा केक माझ्या वाढदिवसाचं स्पेशल गिफ्ट… कालपरवापर्यंत अवतीभवती वावरणारी माझी लेक रेवती आता नोकरी करते. तिने तिच्या पगारातून माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आवर्जून हा केक आणला आणि आईचं मन लेकीच्या कौतुकानं सुखावलं. मुलांचं यश आई-वडीलांना आपल्या यशापेक्षा नेहमीच मोठं वाटतं” असं सुप्रिया सुळेंनी इन्स्टा पोस्टमध्ये म्हटले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, बुधवारी दिवसभरात देशासह महाराष्ट्रातील अनेक क्षेत्रातील लोकांनी सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर सुप्रिया सुळेंनी आणखी एक पोस्ट करत सर्वांचे आभार मानले होते.
“नमस्कार, आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने केलेल्या शुभेच्छांच्या वर्षावाबद्दल आपले मनापासून आभार. यावर्षी कोरोनाच्या भीषण संकटात आपण आपली अनेक जीवाभावाची माणसं गमावली.त्या सर्वांची आज आठवण येतेय.त्यांचे स्मरण करतानाच आपण केलेल्या अभिष्टचिंतनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. आपण सर्वजण माझ्यावर जो विश्वास टाकताय,जे प्रेम देताय हे अद्भुत आहे. याबद्दल मी आपणा सर्वांची ऋणी आहे. करोनाचा हा कठीण काळ लवकर संपावा आणि सर्व काही पुर्वीसारखं सुरळीत व्हावं हीच परमेश्वराकडे प्रार्थना. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे मनापासून आभार” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते.