Ayodhya Ram Mandir: आज राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने देशभरात अगदीच उत्साहाचे वातावरण दिसत आहे. श्रीराम यांच्यासाठी प्रत्येक रामभक्त आपापल्या परीने अनोख्या गोष्टी करताना दिसून येत आहे. बिस्किटांपासून राम मंदिर, तर काही जण रांगोळी आणि वाळूशिल्पातून राम मंदिराची प्रतिकृती साकारताना दिसून आले आहेत. तर सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये गुजरातमधील सुरत येथील रहिवाशाने सगळ्यात महागड्या कारवार थेट अयोध्या साकारली आहे.
सुरतमधील या व्यापारी रामभक्ताचे नाव सिद्धार्थ दोशी आहे. या रामभक्ताने सर्वात महागड्या आणि आलिशान जॅग्वार कारवर थेट अयोध्या साकारली आहे. पूर्ण कारला पिवळा आणि भगवा रंग देण्यात आला आहे. अगदी संस्कृत भाषेत श्लोक, श्रीराम यांचे पेंटिंग, श्रीराम मंदिराची प्रतिकृती आणि पणत्या तसेच भगवा झेंडा लावून या आलिशान गाडीला एक अनोखा पारंपरिक लूक दिला आहे. तुम्हीसुद्धा ही अनोखी कार पाहाच.
व्हिडीओ नक्की बघा :
तसेच गुजरात सुरतमधून ही कार थेट आता अयोध्येत दाखल झाली आहे आणि या व्यापाऱ्याचं आणि त्याच्या अनोख्या कारचं स्वागतदेखील करण्यात आलं आहे. सिद्धार्थ दोशी यांनी या खास प्रसंगी सांगितले की, ७५वा आजादी अमृत महोत्सव, चांद्रयान आणि त्यानंतर आता प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा या ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार होण्याचं त्यांना भाग्य मिळालं आहे, म्हणून मी ही कार प्रभू श्रीराम यांच्या प्रतिकृतीने सजवण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी सिद्धार्थ दोशी यांनी ७५वा आजादी अमृत महोत्सव, चांद्रयान हे ऐतिहासिक क्षण साकारत गाडीची सजावट केली होती.याचे फोटो त्यांच्या @isiddarthdoshi या एक्स (ट्विटर) अकाउंटवर आहेत.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @isiddarthdoshi आणि @erbmjha या एक्स (ट्विटर) वरून शेअर करण्यात आला आहे. जॅग्वार कारच्या सनरूफ आणि गाडीच्या सुरुवातीलासुद्धा मोठी श्रीराम मंदिराची प्रतिकृती चित्रित केली आहे. सिद्धार्थ दोषी यांनी कारला रंग देऊन आणि त्याची सजावट करून या आलिशान गाडीचे अयोध्येत रूपांतर केले आहे; जे पाहून तुम्ही कौतुक केल्याशिवाय राहणार नाही.