गेले काही दिवस प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या आहेत की सुरतमधल्या प्रसिद्ध हिरे व्यापाऱ्यानं आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून ६०० कार भेट दिल्या आहेत. हरे कृष्ण या आपल्या कंपनीतल्या हिऱ्यांवर काम करणाऱ्या कारागिरांना ही भेट मालक सावजी ढोलकियांनी दिल्याचे हे वृत्त आहे. ढोलकियांवर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव झाला आहे. मात्र, या वृत्ताला एक वेगळा पैलू आहे. मेरान्यूज डॉट इननं दिलेल्या वृत्तानुसार त्यांनी या कंपनीतल्या कर्मचाऱ्यांशी बोलून नक्की काय हे प्रकरण आहे ते जाणून घेतलं आणि रंजक माहिती समोर आली आहे.
या कंपनीमधले कर्मचारी कॉस्ट टू कंपनी या तत्वावर काम करतात. म्हणजे कर्मचाऱ्याला एका वर्षात किती पगार द्यायचा हे आधीच निश्चित झालेलं असतं. हा सगळा एकूण कर्मचाऱ्यावर केला जाणारा खर्च म्हणजे कॉस्ट टू कंपनी किंवा सीटीसी. त्यामुळे बोनस म्हणून जी काही रक्कम ठरते ती दर महिन्याच्या पगारातून कापली जाते. त्यानंतर बोनस म्हणून दिवाळीला कार भेट देताना, कार कंपनीला संपूर्ण रक्कम अदा केली जाते. त्यामुळे हरे कृष्ण ही कंपनी बोनस म्हणून कर्मचाऱ्यांना कार देते हे अर्धसत्य असून बऱ्यापैकी पैसे हे कर्मचाऱ्याच्या सीटीसीतलेच म्हणजे पगारातलेच असतात.
मूळ बातमी इथं वाचा… दिवाळी बोनस! हिरे व्यापाऱ्याने कर्मचाऱ्यांना दिल्या ६०० कार
शिवाय या ६०० गाड्या कंपनीच्या नावे खरेदी केल्या जातात, आणि जे कर्मचारी गाड्या स्वीकारतात त्यांना पाच वर्ष नोकरी सोडणार नाही असे हमीपत्र लिहून द्यावे लागते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पाच वर्ष नोकरी सोडता येत नाही शिवाय महिन्याचा कारच्या कर्जाचा ईएमआय आहे, त्यातला अर्धा हिस्सा त्यांना भरावा लागतो. त्याशिवाय एकदम इतक्या गाड्या खरेदी केल्यामुळे प्रति कार ८० हजार रूपयांचे डिस्काउंट कंपनीला मिळते. या खेरीज कारचा जो जीएसटी भरण्यात येतो, त्याचं टॅक्स क्रेडिट कंपनीला मिळतं कारण कंपनीच्या नावावर कारची खरेदी झालेली असते. त्यामुळे कंपनीला लाखो रूपयांच्या जीएसटीचं क्रेडिट मिळतं.
त्यामुळे ही कंपनी अत्यंत उदारपणे आपल्या कर्मचाऱ्यांना कार बोनस देते असं चित्र रंगवणं चुकीचं असून कर्मचाऱ्यांच्याच बहुतांश पैशातून हे केलं जातं आणि कंपनीला टॅक्स क्रेडिट सारखा लाभ होतो तो वेगळाच असा दावा मेरान्यूजनं केला आहे.