आयुष्याचा आनंद लुटण्यासाठी, नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी आपल्याला वयाचे बंधन नसते; हे वाक्य आपण कितीतरी वेळा ऐकलेले आहे. या वाक्यामुळे आपल्याला काहीतरी नवीन करण्याची इच्छा तर होते, मात्र प्रत्यक्षात क्वचितच कुणी असतात, जे कोणत्याही वयात नवनवीन गोष्टी करून दाखवण्याची हिंमत ठेवतात. जस जसे आपले वय वाढत जाते, तस तसे आपल्याला धाडसी गोष्टी करण्याची भीती वाटू लागते. मात्र, या ८० वर्षांच्या वृद्ध महिलेने असे सर्व विचार खोडून काढून अतिशय भन्नाट आणि प्रचंड कठीण अशी गोष्ट शिकून, करून दाखवली आहे.
कोस्टा रिकाची ऑलम्पिक धावपटू [Olympic athlete] ब्रिसा हेनेसी तिच्या ८० वर्षांच्या आजीला समुद्रावर चक्क सर्फिंग करण्यासाठी घेऊन आली होती. समुद्राच्या लाटांवर बोर्डच्या साहायाने उभे राहणे/ लाटांवर स्वार होण्याला सर्फिंग म्हणतात. इन्स्टाग्राम या सोशल मीडिया माध्यमावरील आपल्या @brisahennessy या अकाउंटवरून तिने दोघींचा सर्फिंग करतानाच व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिची आजी सुरुवातीला याचे प्रशिक्षण घेताना दिसत आहे. नंतर दोघी एका बोर्डवर बसून लाटांचा अंदाज घेत आहेत. योग्य लाट आल्यानंतर तिच्या आजीने अगदी शिकवल्याप्रमाणे सर्फिंग केल्याचे आपण पाहू शकतो. दोघींच्या गप्पांमधून आणि चेहऱ्यावरील आनंद अगदी बघण्यासारखा आहे.
हेही वाचा : पाळीव कुत्र्याने केला चक्क ३ लाखांचा नाश्ता!! सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहा…
हा व्हिडीओ शेअर करताना तिने खाली, “याला म्हणतात ८० वर्ष! लाटांवर स्वार होण्यासाठी वेळेचे, वयाचे बंधन नसते. माझी आवडती जागा मला माझ्या आजीला दाखवायला मिळाल्याचा खूप आनंद होत आहे”, अशा आशयाचे कॅप्शन दिलेले आहे. हा व्हिडीओ शेअर होताच याने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अनेकांनी त्या दोघींचे कौतुक केले आहे. काय आहेत यावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहा.
“मी काही दिवसांमध्ये ६० वर्षांची होणार आहे आणि हा व्हिडीओ बघून आता मलाही सर्फिंग करावेसे वाटत आहे”, अशी एकाची प्रतिक्रिया आहे. “माझे आनंदाश्रू थांबत नाहीयेत”, अशी दुसऱ्याने प्रतिक्रिया दिली आहे. तिसऱ्याने, “हा व्हिडीओ बघून मला प्रचंड आनंद होत आहे” असे म्हटले आहे. “इतका सुंदर व्हिडीओ मी आजपर्यंत पाहिला नाहीये, खूप मस्त; आजी तुम्ही भारी आहेत”, असे चौथ्याने म्हटले आहे. तर शेवटी पाचव्याने, “असं सक्रिय म्हातारपण कुणाला नाही आवडणार? प्रत्येकाचं हेच ध्येय असायला हवे”, असे म्हटले आहे.