पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांबाबत कायमच चर्चा होते. मात्र, या दौऱ्यांमुळे मोदींची सातासमुद्रापार ख्याती असल्याचे दिसते. ही ख्याती केवळ भारताचे पंतप्रधान म्हणून नाही, तर आणखी बऱ्याच कारणांमुळे आहे. काय म्हणून ओळखतात परदेशी नागरीक मोदींना? ही उत्तरे ऐकून तुम्हीही खरंच थक्क व्हाल.
यूट्यूबवर प्रसिद्ध असणाऱ्या रिक्षावालीने नुकतेच स्पेनमधील इबिझा येथील नागरिकांना मोदींविषयी विचारले. अतिशय लहान बेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या इबिझातील लोकांना नरेंद्र मोदी माहिती आहेत, ही भारतीयांसाठी निश्चितच आनंदाची बाब आहे. नरेंद्र मोदी यांची प्रसिद्धी किती आहे हे पाहण्यासाठी रिक्षावालीने हा खटाटोप केला होता. यामध्ये तिला मिळालेली काही उत्तरे अतिशय आश्चर्यकारक आहेत.
इबिझाच्या अनेक नागरिकांनी मोदी हे पॉवरफुल लीडर असल्याचे सांगितले. तर काहींनी आम्ही मोदींना त्यांच्या योगामुळे ओळखत असल्याचे सांगितले. त्यामुळे मोदींच्या योगाबाबत भारतातच नाही तर परदेशातही चर्चा होत असल्याचे यावरुन समोर आले आहे. मोदींनी जगभरात योग दिवस सुरु केल्याचे एका नागरिकाने सांगितल्यावर रिक्षावालीलाही धक्का बसला. योगाबाबत आम्ही मोदींना फॉलो करतो, असे सांगत इबिझातील काही जणांनी चक्क योगासनेही करुन दाखवली. त्यामुळे मोदींमुळे भारतीय योगाचा प्रचार होत असल्याचे जणू दर्शनच घडले.
याशिवाय एकाने तर चक्क मोदींचा फोटो दाखवूनही हे गांधी आहेत, असे म्हटले. त्यामुळे आता याच्यासमोर नेमके काय बोलावे हे रिक्षावालीलाही सुचले नाही. तर आणखी एकाने मोदींमध्ये इतकी ताकद आहे की ते अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ‘पंच’ मारु शकतात आणि अमेरिकेला ट्रम्प यांच्यापासून मुक्त करू शकतात, असे सांगितल्यावर मात्र मोदींच्या नेतृत्त्वाकडे परदेशात कशा पद्धतीने पाहिले जाते याचा अंदाज आल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे एका लहानशा बेटावर भारताच्या पंतप्रधानांची असणारी ओळख स्पष्ट झाली.