सूर्यकुमार यादवचं नाव घेतलं की डोळ्यांसमोर येतात ते त्याचे मैदानाच्या चहूबाजूला मारलेले भन्नाट शॉट्स! क्रिकेटच्या शिकवणीत कुठेही उल्लेख नसलेल्या पद्धतीने जेव्हा सूर्यकुमार त्याचे काही विशेष फटके खेळतो, तेव्हा बघणाऱ्या कोट्यवधी क्रिकेटचाहत्यांच्या डोळ्यांचं पारणं फिटतं. त्यामुळेच सूर्याला ‘मिस्टर ३६०’ असं नाव पडलं. पण BCCI नं नुकत्याच शेअर केलेल्या सूर्याच्या एका व्हिडीओमध्ये तो फक्त मैदानावरच नाही, तर मैदानाच्या बाहेरही ‘मिस्टर ३६०’च आहे असं न वाटलं तरच नवल! सूर्यानं मुंबईत केलेल्या या भन्नाट प्रँकमुळे मरीन ड्राईव्हवरचे मुंबईकर मात्र तोंडात बोट घालून आश्चर्य व्यक्त करत राहिले!
नेमकं काय झालं?
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारताचा २ नोव्हेंबर रोजी श्रीलंकेशी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सामना होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया मुंबईत दाखल झाली आहे. पण सूर्यकुमार यादवनं हॉटेलमध्ये न बसता चक्क मरीन ड्राईव्हवर जायचा निर्णय घेतला. पण यासाठी त्यानं अशी भन्नाट कल्पना केली की कुणीच त्याला ओळखूही शकलं नाही! शेवटी जेव्हा त्यानं स्वत:च आपण सूर्यकुमार यादव आहोत, हे सांगितलं, तेव्हा मात्र मरीन ड्राईव्हवर जमलेल्या मुंबईकरांना आश्चर्याचा धक्काच बसला!
सूर्यकुमार यादव झाला कॅमेरामन!
सूर्यकुमार यादवनं यासाठी अंगात पूर्ण बाह्यांचा एक शर्ट घातला होता. असं केल्यामुळे हातावरचे टॅटू पूर्णपणे झाकले जातील, असं त्यानं स्वत:च व्हिडीओमध्ये सांगितलंय. डोक्यावर कॅप, काळा गॉगल आणि तोंडावर मास्क अशा वेशात सूर्यकुमार यादव मरीन ड्राईव्हवर दाखल झाला. आपण ‘सूर्या कॅम’ या चॅनलसाठी वर्ल्डकपसंदर्भात प्रतिक्रिया घेत आहोत, असं सांगून त्यानं काही मुंबईकरांच्या प्रतिक्रियाही घेतल्या. कुणालाही तो सूर्यकुमार यादव असल्याचा पत्ताच लागला नाही.
काही मुंबईकरांनी आपल्याला विराट कोहली आवडत असल्याचं सांगितलं तर काहींनी रोहित शर्मासाठीच आपण सामने बघायला जातो, असं सांगितलं. एकानं तर सूर्यकुमार यादवला वरच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी यायला पाहिजे असं म्हणत त्याला आपला खेळ सुधारण्याचाही सल्ला दिला! शेवटी एका तरुणीची प्रतिक्रिया घेतल्यानंतर सूर्यकुमार यादवनं तिला आपली खरी ओळख सांगितली. तेव्हा मात्र त्या तरुणीच्या आनंदाला पारावारच राहिला नाही! त्याआधी सूर्यकुमारच्या फलंदाजीच्या स्टाईलचं या तरुणीनं तोंडभरून कौतुक केलं हे काही वेगळं सांगायला नको!
हे सगळं करून झाल्यावर हॉटेलमध्ये परत जाताना “मी तेवढा काही वाईट अभिनेता नाही” अशी टिप्पणी करायलाही सूर्यकुमार यादव विसरला नाही!