भारतीय संघातील सलामीवीर सूर्यकुमार यादव, कर्णधार रोहित शर्मा आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत यांनी मराठीत एका चाहत्याशी साधलेला संवाद सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. विशेष म्हणजे या व्हिडीओच्या शेवटी या मराठमोळ्या चाहत्याने स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये जिकलेल्या चषकांच्या बाजूला असलेली घरातील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दाखवल्यानंतर रोहित शर्माने ‘जय हो’ची घोषणा दिल्याचं पहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चाहत्यांसोबत इन्स्टाग्रामच्या माध्यमातून गप्पा मारताना सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत आणि रोहित शर्मा यांनी सूर्यकुमारच्या एका जुन्या सहकऱ्याशी चर्चा केली. यावेळेस सूर्यकुमार, रोहित आणि पंत व्हिडीओ चॅटवर असल्याचं पाहून चाहत्याला विश्वासच बसला नाही आणि तो ‘आई शप्पथ’ असं म्हणला. हे ऐकतानाच रोहितने “मराठी माणूस आला वाटतं” असं म्हटलं. त्यानंतर या चाहत्याने मुंबईत फार पाऊस असल्याचं सांगितलं. त्यावर सूर्यकुमारनेही त्याच्या रुमबाहेरील दृष्य दाखवत इथे पण पाऊस आहे असं मराठीत म्हटलं.

या चाहत्याने आपल्या रुममधील सहकाऱ्यांना आपण रोहित शर्मा आणि सूर्यकुमारसोबत बोलत असल्याचं सांगितलं असता त्यांना खोटं वाटलं. त्यावर सूर्यकुमारने, “अरे मग दाखव ना बरोबर” असं म्हटलं. “मी तुला ओळखतो तू बीएआरसीमधला ना? मी इथं वाशीत राहतो,” असं या चाहत्याने म्हटलं. त्यावर सूर्यकुमारने “जास्त लांब नाही” अशी प्रतिक्रिया दिली. या चाहत्याने आपण इंडियन क्रिकेट टीमची जर्सी परिधान केल्याचं सांगतानाच रोहितचं नाव असणारी टोपीही दाखवली. यावर पंतने, “हे लोक क्रिकेट खेळतात असं वाटतं” अशी प्रतिक्रिया दिली.

पंतच्या या प्रतिक्रियेनंतर या चाहत्याने आपल्याकडे क्रिकेटच्या बऱ्याच ट्रॉफी असल्याचं सांगत भिंतीवरील फळीवर ठेवलेले चषक दाखवत, “या बघ आमच्या ट्रॉफी” असं म्हटलं. त्यावर रोहितने ‘मस्त’ असं उत्तर दिलं. त्यानंतर या चाहत्याने ट्रॉफींच्या बाजूला असणारी सिंहासनावर विराजमान झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दाखवत, “छत्रपती शिवाजी महाराजांचा…” अशी हाक दिली. त्यावर रोहितने “विजय असो” असं तर पंतने “जय हिंद” असं उत्तर दिलं. हा व्हिडीओ मुंबई इंडियन्सच्या ट्विटर अकाऊंटवरुन जेव्हा मुंबईकर हे मुंबईकराला भेटतात अशा कॅप्शनसहीत शेअर केलाय.

कालच अशाच एका व्हिडीओ चॅटमध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीही सहभागी झाला होता.