ट्विट करून एखाद्याने स्वराज यांच्याकडे मदत मागितली आणि त्यांनी ती केली नाही तर नवलच. ट्विटरवर मदत मागणा-या प्रत्येकाच्या मदतीला त्या धावून जातात, त्यामुळे त्यांनी सगळ्यांचीच मने जिंकून घेतली आहेत. मदतीला योग्य वेळी धावून येण्याच्या स्वराज यांच्या स्वभावामुळे त्या नेटीझन्सच्या गळ्यातल्या ताईत बनल्या आहेत. आता तीन महिलाच्या तीन समस्या एकाच वेळी सोडवून  पुन्हा एकदा नेटीझन्सची मने त्यांनी जिंकली.

एकाच वेळी ट्विट करत तिघींनी स्वराज यांच्याकडे मदत मागितली होती. त्यातल्या एकीचे पती तिला सोडून अमेरिकेला गेले. घरच्यांचे टोमणे ऐकून ती त्रस्त झाली आहे तेव्हा या प्रकरणात स्वराज यांनी लक्ष घालण्याची विनंती तिने ट्विट करत केली. स्वराज यांनीही दखल घेत या प्रकरणात अमेरिकेतल्या भारतीय दूतावासाकडून तिला मदत मिळेल असे आश्वासन दिले. तर दुसरीकडे एका मुलीला मेक्सिकोत स्पर्धेसाठी जायचे होते पण आर्थिक अडचणी येत होत्या, तिच्याही ट्विटला स्वराज यांनी उत्तर दिले. त्याच वेळी आणखी एक महिलेने ट्विट करत स्वराज यांच्यापुढे आपली समस्या मांडली. तिचा नवरा न्यूझीलॅडमध्ये राहतो, पण तिला तीन वेळा व्हिसा नाकारण्यात आला, तेव्हा आता मी आत्महत्या करू का? असे ट्विट तिने केले, जोपर्यंत तुम्ही माझी दखल घेत नाही तोपर्यंत मी ट्विट करत राहणार असेही तिने म्हटले. तेव्हा आत्महत्या न करण्याची विनंती स्वराज यांनी केली आणि तिला सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिले. स्वाती सिंग, ज्योती पांडे आणि रिचा पटेल या तिघींच्याही ट्विटची दखल घेत स्वराज मदतीला पुन्हा एकदा धावून आल्यात.

Story img Loader