भारताच्या पराराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या ट्विटरवर जास्त सक्रिय असतात. ट्विटरवर कोणीही मदतीची याचना केली की सुषमा स्वराज यांनी तातडीने त्यांची दखल घेतली आहे. काही दिवसांपूर्वी एका नव-याला आपल्या बायकोविना हनीमुनला जावे लागले. त्यांनी मदत मागितल्यावर स्वराज यांनी तातडीने त्याला मदत केली. इतकेच नाही तर काही जणांनी गाडी बंद पडली किंवा बाबा घरी आले नाही असे सांगूनही मदत मागितली आहे. पण या याचकांना नाराज न करता स्वराज यांनी अत्यंत शांतपणे त्यांच्या विनंतीला उत्तर दिले.
पण या गोष्टींपूरता ठिक होते आता तर आपल्या पतीच्या भानगडीत लक्ष घालण्याची विनंती स्वराज यांना एका महिलेने केली आहे. ही महिला आपण डॉक्टर असल्याचा दावा करते. कुवेत येथे पती आणि मुलासोबत वास्तव्यास असलेल्या या महिलेच्या पतीचे विवाहबाह्य संबंध आहेत. त्यामुळे आपले वैवाहिक जीवन उद्धवस्त करू पाहणा-या परस्त्रीचा पत्ता स्वराज यांनी शोधावा अशी विनंती या महिलेने केली आहे. या महिलेने नव-याच्या आयुष्यात असणा-या परस्त्रीचा फोन नंबर ट्विट केला असून या स्त्रीचे खरे नाव, व्यवसाय आणि इतर माहिती शोधण्यासाठी स्वराज यांनी मदत करावी अशी विनंती तिने केली. त्यावर तुझ्या दु:खात मी सहभागी आहे पण  या प्रकरणात नव-याला शिक्षा करण्याचा कोणताही अधिकार मला नाही असे स्वराज यांना स्पष्ट करावे लागले. या प्रकारामुळे आपण पराराष्ट्र मंत्री असून विवाह बाह्य प्रकरणे हाताळणा-या मंत्री नाही हे सांगण्याची वेळ स्वराज यांच्यावर आली.

Story img Loader