जानेवारी महिन्यात अॅमेझॉनच्या संकेतस्थळावर भारतीय राष्ट्रध्वजाच्या पायपुसण्या आणि चप्पला विक्रिसाठी ठेवण्यात आल्या होत्या. भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी भारतातले वातावरण चांगलेच तापले होते, त्यामुळे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी अॅमेझॉनला चांगलेच फैलावर धरले होते. जर लगेच अशा उत्पादनांची विक्री थांबवली नाही तर कठोर कारवाई करण्यात येईल अशी धमकी स्वराज यांनी दिली होती, त्यानंतर अॅमेझॉनने लगेच माफी मागत ही सारी उत्पादने आपल्या साईट्सवरून हटवली होती. पण अॅमेझॉनच्या माफीवरच हे प्रकरण थांबले नाही आता अॅमेझॉनवर कारवाई करण्यासाठी सुषमा स्वराज यांनी आणखी एक पाऊल उचलले असल्याचे समजत आहे.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या महितीनुसार भारताने काही दस्ताऐवज अमेरिका आणि कॅनडाच्या दूतावासात पाठवली आहे. राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी अॅमेझॉनच्या वरिष्ठांसमोर हा मुद्दा उपस्थित करा अशी मागणी या दस्ताऐवजात केली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अमेझॉनच्या वरिष्ठापुढे तितक्याच ताकदीने हा मुद्दा उपस्थित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे केवळ माफी मागून हे प्रकरण निवळणार नाही, हे भारताने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. तसेच भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान करणारे कोणतेही उत्पादन अॅमेझॉनच्या कोणत्याही संकेतस्थळावर यापुढे दिसणार नाही अशी हमी देखील भारताने मागितली असल्याचे समजत आहे.
काही दिवसांपूर्वी अॅमेझॉन कॅनडाच्या वेबसाईटवर भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगाच्या पायपुसण्यांची विक्री होत असल्याने तेथील भारतीयांनी त्याला विरोध केला होता. तसेच अॅमेझॉनविरोधात याचिकाही दाखल केली होती. त्यामुळे भारतात अॅमेझॉनविरुद्ध वातावरण चांगलेच तापले होते. अॅमेझॉनने तात्काळ या उत्पादनांची विक्री बंद करावी आणि बिनशर्त माफी मागावी. अन्यथा अॅमेझॉनच्या एकाही अधिकाऱ्याला भारतीय व्हिसा दिला जाणार नाही. तसेच याअगोदर देण्यात आलेले व्हिसाही रद्द करण्यात येतील, अशी तंबीच सुषमा स्वराज यांनी अॅमेझॉनला दिली आहे. याशिवाय, स्वराज यांनी कॅनडातील भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांनाही ही गोष्ट अॅमेझॉनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत नेण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या सगळ्या घडामोडींनंतर अॅमेझॉन कॅनडाने आपल्या संकेतस्थळावरून संबंधित पेज हटवले होते. यापूर्वीही अॅमेझॉनकडून अशाप्रकारचा प्रमाद घडले होते. गेल्यावर्षी अॅमेझॉनने भारतीय देवी- देवतांची चित्र छापून काही वस्तूंची विक्री केली होती. यावरून बराच वादंगही निर्माण झाला होता.