अभिनेत्री सुष्मिता सेन आणि आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी सोशल मीडियावरुन आपल्या नात्याची कबुली दिल्यानंतर त्यांची खिल्ली उडवली जात आहे. या दोघांनाही मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. अनेकांनी सुष्मिता सेन आणि ललित मोदींना वय, पैसा, संपत्ती, पूर्वाश्रमीचे जोडीदार यासारख्या मुद्द्यांवरुन लक्ष्य केल्याचं पहायला मिळत आहे. मात्र या सर्व टीकाकांना सुष्मिता सेनने उत्तर दिलं आहे. सुष्मिता ही पैशांसाठी ललित मोदींसोबत रिलेशनमध्ये असल्याची टीका करणाऱ्यांना कठोर शब्दांमध्ये सुनावलं आहे.

नक्की वाचा >> ललित मोदी आणि सुष्मिता सेनच्या नात्यावर मुलगा रुचिरची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “खरं तर मी…”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुष्मिताने स्वत:चा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती समुद्रकिनारी असणाऱ्या एका रिसॉर्टमधील इन्फिनीटी स्विमींग पूलजवळ बसलेली दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना सुष्मिताने टीकाकारांना लक्ष्य केलं आहे. “मी स्वत:वर लक्ष केंद्रीत करत असून मला माझ्या कर्तव्यांची जाणीव आहे. एकात्मता दाखवण्यासाठी निसर्ग ज्यापद्धतीने सर्व काही एकरुप करतो आणि त्याचवेळी आपण तो (नैसर्गिक) समतोल मोडतो तेव्हा किती विभागलेले असतो हे पाहणे मला फार आवडते,” असं पोस्टच्या सुरुवातीला सुष्मिताने म्हटलंय.

पुढे बोलताना सुष्मिताने, “आपल्या आजूबाजूचे जग हे एवढं विस्कळीत आणि दु:खी असल्याचं पाहून हृदयाला (मनाला) वेदना होतात,” असंही म्हटलंय. त्यानंतर सुष्मिताने मागील काही दिवसांपासून तिच्याबद्दल मतं व्यक्त करणाऱ्यांना सुनावलं आहे. “कथित विचारवंत त्यांच्या साचेबद्ध विचारसणीनुसार अज्ञानीपणे आणि केवळ वायफळ चर्चा करण्याच्या दृष्टीकोनातून एखाद्या व्यक्तीकडे पाहतात. जे कधी माझे मित्र किंवा जवळचे नव्हतेच ते सारे लोक आज माझं आयुष्य आणि माझ्या चारित्र्याबद्दल त्यांची मतं आणि ज्ञान वाटताना दिसत आहेत. मला ते गोल्ड डिगर (पैशांसाठी एखाद्याच्या मागे लागणारी) म्हणत आहेत. हे फारच हुशारीचे लक्षण आहे,” असा उपरोधिक टोला तिने लगावला आहे.

नक्की वाचा >> “मी ललितला फोन करुन विचारलं तुला हे जमलं कसं? तो म्हणाला, मोदी है तो मुमकिन है”

गोल्ड डिगरवरुनच सुष्मिताने अजून एक टोला पोस्टमध्ये लगावला आहे. “खरं तर मला सोन्याहून अधिक हवं आहे. मला कायमच हिऱ्यांमध्ये रस होता आणि मी हिऱ्यांनाच प्राधान्य दिलंय. आणि हो आजही मीच स्वत:साठी हिरे खरेदी करते,” असं सुष्मिताने म्हटलंय.

शेवटच्या परिच्छेदामध्ये सुष्मिताने आपल्यावर या टीकेचा किंवा मताचा काहीही परिणाम झाला असून आपली चिंता चाहत्यांनी, हितचिंतकांनी करु नये असं म्हटलंय. “माझ्या हितचिंतकांनी आणि जवळच्या व्यक्तींनी मला दाखवलेल्या पाठिंब्यासाठी मी त्यांची आभारी आहे. तुम्ही एक लक्षात ठेवा की तुमची सुष्मिता ही एकदम व्यवस्थित आहे. कारण मी कधीच उधारीच्या आशा, अपेक्षा, लोकांची परवानगी किंवा कौतुकावर अवलंबून राहिलेली नाही. मी सूर्यासारखी आहे. स्वत:वर लक्ष केंद्रीत करणारी आणि कर्तव्यांची जाणीव असणारी आहे,” असं सुष्मिता म्हणालीय. “सर्वांना खूप सारं प्रेम,” असंही तिने पोस्टच्या शेवटच्या ओळीत म्हटलंय.

गुरुवारीच ललित मोदी यांनी सोशल मीडियावरुन सुष्मितासोबतच्या नात्याबद्दलचा खुलासा केला होता. “कुटुंबासोबत मालदीव, सार्दानियाच्या दौ-यावरुन नुकताच लंडनला परतलो. यावेळी माझी ‘बेटर हाफ’ सुश्मिता सेनही सोबत होती. अखेर नवी सुरुवात आणि नवं आयुष्य सुरु झालं आहे. माझ्या आनंदाला पारावार उरलेला नाही,” अशा मजकुरासोबत ललित मोदींनी सुष्मितासोबतचे काही फोटो शेअर केले होते. ललित मोदींनी केलेल्या या खुलाश्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यानंतर या दोघांना ट्रोल केलं होतं. यावरुनच आता दोघांनाही त्यांना ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushmita sen takes a dig at trolls calling her gold digger slams those who comment on her relation with lalit modi scsg