जंगलात ४० माकडांचा संशयास्पद मृत्यू झआल्याने एकच खळबळ उडाली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने माकडांचा मृत्यू कसा झाला? याचं कारण आता वन विभागाकडून शोधलं जातं आहे. एकदम ४० माकडांचा मृत्यू झाल्याने या हत्या तर नाहीत ना? अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये सुरु झाली आहे. उत्तर प्रदेशातल्या हापूड जिल्ह्यात ही घटना घडली आहे.
नेमकी घटना काय घडली?
वन विभागाचे अधिकारी संजय मॉल यांनी सांगितलं की वन विभागच्या पथकाला काही माकडांचे मृतदेह सापडले. या मृतदेहांच्या जवळ गुळाचे आणि कलिंगडाचे तुकडेही सापडले. यावरून असं वाटतं आहे की गूळ आणि कलिंगड यामध्ये बहुदा विष मिसळून माकडांना खाऊ घातलं गेलं आहे. त्यामुळे या माकडांचा मृत्यू जाला आहे. माकडांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. त्या अहवालानंतरच या प्रकरणी नेमकं काय झालं हे ठोसपणे सांगता येईल असंही मॉल यांनी म्हटलं आहे.
माकडांवर विषप्रयोग?
इथल्या स्थानिकांनी अशी माहिती दिली आहे की यातली काही माकडं तडफडत होती. त्यानंतर त्यांचा जीव गेला. काही माकडांच्या तोंडातून फेसही येत होता. इतक्या मोठ्या संख्येने माकडांचा मृत्यू झाल्याने वनविभागाचे अधिकारीही चक्रावले आहेत. त्यांच्यावर विषप्रयोग झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र शवविच्छेदन अहवालातच या माकडांच्या मृत्यूचं कारण कळू शकणार आहे. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि पोलीसही घटना स्थळी पोहचले. त्यांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे आणि त्याच अनुषंगाने तपास करत आहेत.
माकडांच्या मृतदेहांजवळ ज्या ज्या गोष्टी आढळल्या त्या सगळ्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. त्यात विष असण्याची शक्यता आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार माकडांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी बरेलीच्या भारतीय पशू आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहेत. या माकडांचा मृत्यू कसा झाला? ते शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच समजू शकणार आहे. NDTV ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.