आपल्या घरी आपण कायमच राजा असतो. मात्र एका भारतीय तरुणाने स्वतःला एका देशाचा राजा घोषित करत जागेवर कब्जा केला आहे. ऐकायला काहीसे अजब वाटत असले तरीही ही घटना घडली आहे. हा तरूण एवढ्यावरच थांबलेला नाही तर त्याने यासंदर्भातली एक फेसबुक पोस्टही त्याच्या अकाऊंटवर पोस्ट केली आहे. इंदौर येथील सुयश दिक्षित नावाच्या या तरुणाने इजिप्त आणि सुदान देशांच्या मध्ये असलेल्या रिकाम्या जागेत एक देश असल्याचे स्वत:च घोषित केले. या जागेवर बाजूच्या दोन्हीही देशांचा मालकी हक्क नव्हता, मात्र आता या तरूणाने जागेवर हक्क सांगत तो माझा देश असल्याचे जाहीर केले आहे.या देशाचे नाव ‘किंग्डम ऑफ दिक्षित’ असल्याचेही त्याने फेसबुक पोस्टद्वारे जाहीर केले.
Video : शो मस्ट गो ऑन; भूकंपाचे धक्के बसत असतानाही वृत्तवाहिनीवर कार्यक्रम सुरूच
स्वतःला राजा घोषित केल्यावर त्याने या देशावर त्याने आपला झेंडाही फडकवल्याचे फेसबुकवर जाहीर केले. युनायटेड नेशन्सने या देशाला मान्यता द्यावी अशी त्याची इच्छा आहे. या तरूणाने कब्जा केलेला सगळा भाग वाळवंटमय आहे. या भागाचे क्षेत्रफळ २०७१ स्क्वेअर किलोमीटर असल्याचेही समजते आहे. सुयशने याठिकाणी विविध प्रकारच्या वृक्षाच्या बिया आणून झाडे लावायलाही सुरुवात केल्याचेही स्पष्ट केले आहे. गंमत म्हणजे त्याने आपल्या वडिलांचीच या देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती आणि संरक्षण मंत्री म्हणून घोषणा केली आहे. ‘द टेलिग्राफने’ दिलेल्या वृत्तानुसार, त्याने आपल्या देशाची वेबसाईटही तयार केली असून माझ्या देशातील काही पदे रिक्त असून तुम्ही त्या पदांसाठी अर्ज करु शकता असे त्याने सांगितले आहे.
यशस्वी होण्यासाठी ‘हे’ पाच फंडे नक्कीच उपयोगी ठरतील
आता या नव्या देशाची लोकसंख्या दोन आहे. या देशाच्या राजधानीचे नाव सुयशपूर ठेवण्यात आल्याचेही त्याने सांगितले आहे. या प्रदेशात आपल्याला केवळ पाल दिसल्याने या देशाचा राष्ट्रीय प्राणी पाल असल्याचेही त्याने घोषित केले आहे. याआधीही २०१४ मध्ये या प्रदेशाला जेरमी हिटन या व्यक्तीने आपला देश असल्याची घोषणा केली होती. मात्र त्याचे पुढे काय झाले हे कळू शकले नाही.