डिलीवरी बॉय ऑर्डर पोहोचवण्यासाठी जातात त्यावेळी त्यांना अनेक चांगल्या वाईट प्रसंगाना सामोरं जावं लागतं. याबाबतच्या अनेक बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण वाचत आणि पाहत असतो. सध्या अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. ज्यामध्ये एका डिलीवरी बॉयला आपला जीव गमवावा लागला आहे.
हैदराबादमधील एका अपार्टमेंटमध्ये फूड ऑर्डर पोहोचवण्यासाठी गेलेल्या डिलीवरी बॉयवर कुत्र्याने हल्ला केला होता. यावेळी घाबरलेल्या डिलीवरी बॉयने थेट इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन खाली उडी मारल्याची घटना घडली होती. या डिलीवरी बॉयवर मागील तीन दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे.
या घटनेत मृत्यू झालेल्या २३ वर्षीय डिलीवरी बॉयचे नाव मोहम्मद रिझवान असं आहे. रिझवान हा बंजारा हिल्समधील एका अपार्टमेंटमधील के. शोभना नावाच्या व्यक्तीची फूड ऑर्डर देण्यासाठी गेला होता. यावेळी त्याने शोभना यांच्या फ्लॅटचा दरवाचा ठोठावला असता घरातील जर्मन शेफर्ड जातीच्या पाळीव कुत्र्याने रिझवानवर हल्ला केला. कुत्र्याने हल्ला केल्यामुळे घाबरलेल्या रिझवानने स्वत:चा बचाव करण्यासाठी थेट इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन खाली उडी मारली.
डिलीवरी बॉयने इमारतीवरुन खाली उडी मारल्याचं पाहताच कुत्र्याच्या मालकाने अॅम्ब्युलन्सला फोन केला आणि रिझवानला रुग्णालयात दाखल केलं. मात्र, खूप उंचावरुन उडी मारल्यामुळे रिजवानची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात आलं होतं. मागील तीन दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र, अखेर त्याचा मृत्यू झाला.
हेही पाहा- दक्षिण कोरियाच्या महिलेने पहिल्यांदा खाल्ली पाणीपुरी; यावर नेटकरी का संतापले पाहा
याप्रकरणी बंजारा हिल्स पोलिसांनी कुत्र्याचा मालक के. शोभनाविरुद्ध कलम ३३६ अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. बंजारा हिल्सचे पोलिस निरीक्षक पी नरेंद्र यांनी सांगितले की, रिझवान तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडल्यामुळे त्याला गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यामुळे त्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान रिझवानचे नातेवाईक रात्री उशिरा बंजारा हिल्स पोलिस स्टेशनमध्ये जमले आणि त्यांनी सदर कुत्र्याच्या मालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.