Swiggy’s Holi Billboard Controversy: स्विगी ही भारतातील सर्वात लोकप्रिय फूड डिलिव्हरी कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीमुळे अनेकांना रोजगार मिळाला आहे. स्विगीच्या डिलिव्हरी सेवेव्यतिरिक्त त्यांच्या जाहिरातींही लोकांना आवडतात. तरुणाईवर लक्ष ठेवून विविध ट्रेंड फॉलो करत या कंपनीच्या जाहिराती तयार केल्या जातात. सोशल मीडिया व्हिडीओ, टेलिव्हिजनवरील जाहिराती, शहरांमध्ये लावलेले मोठे होर्डिंग्स यांच्यामार्फत स्विगीच्या जाहिरातीचे कॅम्पेन केले जाते. या जाहिरातींमुळे कंपनीला प्रसिद्धी मिळत असली तरी काही वेळेस नको त्या वेळी जाहिरात केल्याचा फटकाही स्विगीला बसला आहे. असाच एक प्रकार यंदाच्या होळीच्या दिवशी सोशल मीडियावर पाहायला मिळाला.
मंगळवारी (७ मार्च) संपूर्ण देश रंगोत्सवामध्ये मग्न असताना ट्विटरवर ‘हिंदू फोबिक स्विगी’ (#HinduPhobicSwiggy) हा हॅशटॅग ट्रेंड करत होता. नवी दिल्लीमधील काही भागांमध्ये होळी निमित्त स्विगी कंपनीच्या काही होर्डिंग्स लावण्यात आले होते. या जाहिरातीमध्ये अंड्याचा वापर जेवणात करावा, होळीच्या दिवशी कोणाच्याही अंगावर फोडण्यासाठी करु नये असे लिहिले होते. त्याखाली #बुरा मत खेलो असा संदेश स्विगीद्वारे देण्यात आला होता. स्विगीच्या या जाहिरातीविरोधात नेटकऱ्यांनी कंपनीला हिंदू विरोधी म्हटले.
नेटकऱ्यांनी या प्रकरणावरुन स्विगीला धारेवर धरलं आहे. एका यूजरने ‘तुम्हाला हे सगळं हिंदूच्या सणांच्या वेळी कसं सुचतं’, असे म्हटले. तर दुसऱ्याने ‘दुसऱ्या धर्मीयांच्या सणांच्या दिवशी अशा जाहिराती करुन दाखवा’ अशी कमेंट केली. काही यूजर्सनी स्विगीला बॉयकॉट करा अशी मागणी देखील केली. अनेक मान्यवरांनीही या जाहिरातीच्या प्रकरणावर मत मांडत स्विगीवर टिका केली आहे.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली शहरातील स्विगीचे सर्व होर्डिंग्स काढण्यात आले आहेत. या प्रकरणावर कंपनीने अजूनही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याआधीही स्विगी कंपनी त्यांच्या जाहिरातींमुळे अडचणी सापडली होती. गेल्या काही वर्षांमध्ये जाहिरातींमधील आक्षेपार्ह मजकूरामुळे अनेक कंपन्यांना ग्राहकांचा रोष पत्करावा लागला आहे. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.