Crazy Ride Collapsed: लहानपणी तुमच्यापैकी अनेकांनी आई-वडिलांबरोबर आकाश पाळण्यात बसण्याचा आनंद घेतला असले. गाव वा शहर अनेक मोठ्या जत्रांमध्ये मोठे आकाश पाळणे असतात. पण, काळ बदलतोय तसे आकाश पाळण्याचे स्वरूपही बदलेतय. त्याचा आकार, रंग, उंची आणि तांत्रिक गोष्टी आधुनिक होताना दिसताय. पूर्वी जत्रेत दिसणारे हे आकाश पाळणे वेगळ्या स्वरूपात आता थीम पार्कमध्ये दिसू लागलेत आणि ते क्रेझी राईड्स अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाऊ लागले. हे आधुनिक आकाश पाळणे दिसताना जरी सुरक्षित वाटत असले तरी त्यात थोडाफारही तांत्रिक बिघाड झाला तर ते जीवघेणे ठरतात. अशाचप्रकारे एका थीम पार्कमध्ये असलेला फिरता पाळणा ५० फूट उंचावरून खाली धाडकन खाली कोसळला, ज्यानंतर जे काही घडले ते फार भयानक होते. याच घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काळजाचा ठोका चुकवणारा अपघात
जत्रा असो वा थीम पार्क, आकाश पाळणा हा अनेकांच्या आकर्षणाचा भाग असतो. पण, अनेकदा हे फिरते पाळणे जीवघेणे ठरतात. अशाच एका जीवघेण्या फिरत्या पाळण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका क्रेझी राइडवर लोक अगदी आनंदात, उत्साहात बसण्याचा आनंद घेत आहेत. काही सेकंद राइड हवेत स्विंग करते, पण पुढच्याच क्षणी हवेत असताना तुटते आणि ५० फूट उंचावरून खाली कोसळते.
यामुळे आनंदात किंचाळणारे लोक काही वेळातच जीव वाचवण्यासाठी रडून ओरडू लागतात. हे दृश्य इतके भयानक होते की पाहणाऱ्यांनाही धक्का बसेल. ज्या प्रकारे ही राईड तुटून खाली कोसळली ते पाहता यात अनेक जण जखमी झाले असतील.
हा व्हिडीओ wpd2.0 नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, तो आतापर्यंत १.९ मिलियन वेळा शेअर करण्यात आला आहे. दरम्यान, हा व्हिडीओ चार वर्षे जुना असल्याचे सांगितले जात आहे. १५ जुलै २०१९ रोजी गुजरातच्या अहमदाबादच्या ॲडव्हेंचर पार्कमध्ये ही घटना घडली होती. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला होता, तर २९ जण जखमी झाले होते. हा व्हिडीओ चार वर्षे जुना असला तरी तुमच्या सुरक्षिततेसाठी अशा प्रकारच्या राइड्सवर बसणे टाळले पाहिजे, असे अनेकांनी म्हटले आहे.