सोशल मीडियावर ट्रोलिंगच्या घटना दररोज घडत असतात. कित्येक फोटो, मीम्स, व्हिडिओ शेअर करत असतानाच अशी एखादी घटना घडते, जी एका व्यक्तीला खूप मोठी मदत करून जाते, त्याची स्वप्नं पूर्ण करून जाते. तुर्कीत राहणाऱ्या या १२ वर्षीय सिरियन निर्वासितासोबतही अशीच एक घटना घडली आहे. सोशल मीडियामुळे बूट पॉलिश करणाऱ्या मुहम्मेत हालितला एका जिमचं मोफत आजीवन सदस्यत्व मिळालं आहे.
सिरियातील परिस्थितीमुळे तेथील बरेच नागरिक इतर देशांमध्ये निर्वासित झाले. मात्र या निर्वासितांना त्या त्या देशांनी फारशा आपुलकीने स्वीकारले नाही. या निर्वासितांची समस्या अनेकांनाच ठाऊक आहे. आपला देश सोडण्यासाठी हतबल झालेल्या सिरियन नागरिकांना इतर देशांमध्ये आश्रय घ्यावा लागत असून बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागतं. या सर्व परिस्थितीत त्यांना फक्त मदतीचा हात हवा आहे. असाच मदतीचा हात देऊन तुर्कीतल्या एका जिम मालकाने मायदेशापासून दुरावलेल्या मुहम्मेतला आशेचा किरण दाखवला आहे.
https://www.instagram.com/p/BddMGKvn9l4/
Video : मांजर करु शकते; मग तुम्ही का नाही?; मुंबई पोलिसांचा हा व्हिडिओ नक्की बघा
एका जिमबाहेर उभं राहून काचेतून जिममध्ये बघणाऱ्या मुहम्मेतचा पाठमोरा फोटो ओमर यावुझ या व्यक्तीने काढला. हा फोटो त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. हा फोटो सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की त्या जिमच्या मालकानेही तो पाहिला. जिम मालक मुस्तफा कुकुका याने त्या मुलाला शोधण्यासाठी इन्स्टाग्रामवरच फोटो शेअर केला. त्यासोबतच त्या मुलाला जिमचे आजीवन सदस्यत्व मोफत देण्याचा संदेशही लिहिला. सोशल मीडियाच्याच मदतीने मुहम्मेतची भेट त्या जिम मालकाशी झाली. सिरियन निर्वासिताला ही मोठी भेट देऊन उदारपणा दाखवणाऱ्या त्या जिम मालकावरही सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.