ऑक्टोबर २३, २०२२ ही तारीख पुढील अनेक वर्ष क्रिकेट चाहत्यांच्या लक्षात असेल यात शंका नाही. भारतीय क्रिकेट संघाचे समर्थक आणि माजी कर्णधार विराट कोहलीचे कट्टर चाहते ही तारीख आणि या तारखेला विराटने मेलबर्नच्या मैदानात केलेली खेळी आवर्जून आठवतील यात शंका नाही. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रोमहर्षक ठरलेला टी-२० विश्वचषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामना भारताने चार गडी राखून जिंकला अन् भारतात दिवाळीचा उत्साह द्विगुणित झाला. भारताची स्थिती ३१ धावांवर चार गडी बाद अन् विजयासाठी १६० धावांचं लक्ष्य अशी असताना विराटने सामना जिंकवून दिला अन् हा सामना आता कायमचा क्रिकेट चाहत्यांच्या स्मरणात राहणार आहे.
नक्की वाचा >> Ind vs Pak: बोल्ड झाल्यानंतरही विराट तीन धावा का पळाला अन् सामना संपताना नाबाद कसा राहिला? टर्निंग पॉइण्ट ठरले ‘ते’ दोन चेंडू
पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १५९ अशी धावसंख्या केली. भारताने १६० धावांचे लक्ष्य सहा गडय़ांच्या मोबदल्यात अखेरच्या चेंडूवर गाठले. आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या डावाची सुरुवात अडखळती झाली. नसीम शाहने सलामीवीर केएल राहुल (४), तर हॅरिस रौफने कर्णधार रोहित शर्मा (४) आणि सूर्यकुमार यादव (१५) यांना झटपट माघारी पाठवले. त्यामुळे पॉवर-प्लेच्या सहा षटकांअंती भारताची ३ बाद अशी स्थिती होती. डावखुऱ्या अक्षर पटेलला पाचव्या क्रमांकावर बढती मिळाली. परंतु त्याच्यात आणि कोहलीमधील ताळमेळ चुकला. त्यामुळे अक्षर (२) धावबाद झाली.
कोहली आणि हार्दिक या अनुभवी जोडीने भारताचा डाव सावरला. ‘एमसीजी’च्या मोठय़ा मैदानावर या जोडीने एक-दोन धावा काढून धावफलक हलता ठेवण्याला प्राधान्य दिले. १० षटकांअंती भारताची ४ बाद ४५ अशी धावसंख्या होती आणि विजयासाठी ११५ धावांची आवश्यकता होती. पुढील पाच षटकांत मिळून या दोघांनी ५५ धावांची भर घातली. पुढील दोन षटकांत मिळून केवळ १२ धावा झाल्या. हा सामना भारतीय संघाच्या हातून निसटणार असे वाटत होते. त्याच वेळी कोहलीने शाहीन आफ्रिदीने टाकलेल्या १८व्या षटकात तीन चौकार मारले. पुढील षटकात त्याने रौफच्या गोलंदाजीवर दोन षटकार मारत दडपण कमी केले.
नक्की वाचा >> Ind vs Pak: चित्तथरारक विजय मिळवून दिल्यानंतर विराटचा अनुष्काला कॉल; म्हणाला, “तिने एकच गोष्ट सांगितली की, इथे लोक मला…”
भारताला विजयासाठी अखेरच्या षटकात १६ धावांची गरज होती. डावखुरा फिरकीपटू मोहम्मद नवाजने पहिल्या चेंडूवर हार्दिकला (३७ चेंडूंत ४० धावा) बाद केले. हार्दिक आणि कोहलीने ११३ धावांची भागीदारी रचली. त्यानंतरच्या दोन चेंडूंवर मिळून तीन धावाच निघाल्या. मात्र, नवाजचा पुढील चेंडू ‘नो-बॉल’ ठरला. कमरेवरील हा चेंडू कोहलीने सीमारेषेबाहेर पोहोचवला. त्यानंतर नवाजने वाइड चेंडू टाकला. भारताला तीन चेंडूंत पाच धावांची गरज असताना नवाजने कोहलीच्या यष्टी उडवल्या. मात्र, चेंडू ‘फ्री-हिट’ असल्याने कोहली बाद झाला नाही, शिवाय चेंडू यष्टीला लागून मागच्या दिशेने गेल्याने भारताला तीन धावा करता आल्या. पुढील चेंडूवर दिनेश कार्तिक बाद झाला. मात्र, त्यानंतर वाइड चेंडू आणि मग अश्विनने एक धाव काढून भारताचा विजय सुनिश्चित केला.
नक्की वाचा >> Ind vs Pak: शेवटच्या दोन ओव्हर पाहण्यासाठी उड्डाण पाच मिनिटांनी लांबवलं? विमान मुंबई एअरपोर्टच्या रनवेवर धावत असतानाच…
या रोमहर्षक विजयानंतर अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीनेही ट्वीटरवरुन ‘किंग कोहली परतला’ अशी पोस्ट केली आहे. मात्र भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने या सामन्यानंतर केलेल्या ट्वीटमध्ये कोहलीचा उल्लेख टाळला आहे. “विश्वचषक स्पर्धेला सुरुवात करण्यासाठी याहून अधिक चांगला मार्ग नाही. उत्तम कामगिरी केली आहे भारतीय संघाने,” असं गंभीरने ट्वीट केलं आहे.
नक्की वाचा >> Ind vs Pak: प्रिय अनुष्का, थँक ‘यू’!
याच ट्वीटवरुन अनेकांनी गंभीरला ट्रोल केलं आहे. गंभीरने जाणीवपूर्वकपणे कोहलीचा उल्लेख ट्वीटमध्ये केला नाही अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया अनेकांनी या ट्वीटखाली नोंदवल्या आहेत. एकाने तर सरळ गंभीरला, “कोहलीचं नाव लिहायला लाज वाटते का?” असा रिप्लाय दिला आहे.
अन्य एकाने विराटला टॅग नाही केलं कारण हा त्याच्यावर जळतो असं प्रतिक्रियेत म्हटलं आहे.
इतरही अनेकांनी गौतमला मुक्तपणे कोहलीचा उल्लेख कर असा सल्ला दिला आहे.
अन्य एकाने गंभीरला त्यानेच विराटवर केलेल्या टीकेची आठवण करुन दिली आहे. विराटने संघासाठी खेळलं पाहिजे स्वत:साठी नाही असं म्हणालेलास ना. आता काय म्हणशील? असा प्रश्न एका चाहत्याने विचारला आहे.
काही दिवसांपूर्वीच गंभीरने अप्रत्यक्षपणे विराटवर टीका करताना, “संघासाठी खेळावं विक्रमांसाठी नाही,” असं म्हटलं होतं. त्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कोहलीने दमदार कामगिरी केल्यानंतर आता त्याचा साधा उल्लेखही गंभीरने केला नाही म्हणून विराटचे चाहते गंभीरला ट्रोल करत आहेत.