जगात अशा अनेक गोष्टी आहेत; ज्या आपण भीतीपोटी करीत नाही. पण, प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक तरी व्यक्ती आलेली असते; जिला सर्व आव्हानात्मक, जीवघेण्या गोष्टी करायच्या असतात. या गोष्टी करणं म्हणजे एक प्रकारे मृत्यूचा थरारक अनुभव घेण्यासारखं असतं. तरीही काही व्यक्ती अशा साहसी गोष्टी करायला नेहमीच तयार असतात; ज्यात खूप रिस्क असते. पण, प्रत्येकालाच अशा साहसी गोष्टी जमतातच, असं नाही. म्हणून तुमच्यासमोर जर कोणी काहीतरी साहसी करायचं, असं म्हटलं तर तुम्ही त्याला आता थेट या रेस्टॉरंटचा पत्ता द्या. कारण- हे रेस्टॉरंट अशा ठिकाणी आहे, जिथे बसून जेवणं म्हणजे एक प्रकारे धाडसी चॅलेंजच आहे, जे पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल, नाद करा पण या जोडप्याचा कुठे!
हे रेस्टॉरंट एवढ्या उंचीवर बांधलं आहे की, जिथे बसून खाली बघितलं तरी कोणाच्याही पोटात गोळा येईल. हे रेस्टॉरंट आपल्या देशात नाही, तर थंड देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्राझीलमध्ये सुरू करण्यात आलं आहे. या रेस्टॉरंटचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण लोकांना समजत नाही की, पिझ्झा किंवा इतर कोणतीही डिश खाण्यासाठी कोणी आपला जीव धोक्यात का घालेल? पण तरी एका जोडप्यानं हे साहस केलं आहे; ज्याचा एक खतरनाक व्हिडीओ त्यांनी पोस्ट केला आहे.
२९५ फूट उंचीवर टांगलेल्या टेबलावर बसून घेतला जेवणाचा आनंद
अमेरिकेतील एका जोडप्यानं ब्राझीलमध्ये अशा गोष्टींचा अनुभव घेतला आहे; जे पाहून तुमचं हृदयदेखील जोरात धडधडू लागेल. ख्रिस्तियाना हर्ट आणि तिच्या रॅप प्रियकरानं एका सुंदर धबधब्याच्या बाजूला नाही, तर धबधब्यावर एका उंचीवर बांधलेल्या टेबलवर बसून जेवणाचा आस्वाद घेतला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ते एका पिकनिक टेबलवर बसले असून, ते टेबल २९५ फूट उंचीवर हवेत लटकत आहे. त्यांच्यासमोर काही स्नॅक्स व रेड वाईनचा ग्लास दिसतोय आणि त्यांना सेफ्टी वायरन बांधलेलं दिसत आहेत. अशा जीवघेण्या उंचीवर असूनही ते अगदी आनंदात जेवत आहेत. जेव्हा तुम्ही त्यांना दुरून पाहाल तेव्हा तुमच्याही काळजात धस्स होईल.
या ठिकाणी जाणं म्हणजे यमराजाला थेट चॅलेंज देण्यासारखं आहे. या ठिकाणी बसताना लोकांना केबल्स आणि वायरच्या मदतीनं बांधलं जातं; पण बाकी पूर्ण टेबल ओपन आहे. या रेस्टॉरंटमध्ये १५ मिनिटं बसण्यासाठी ४५० डॉलर म्हणजेच भारतीय चलनात ३७ हजार रुपयांपेक्षा थोडे अधिक पैसे खर्च करावे लागतील. त्यामुळे तुमचं हृदय खूप मजबूत असेल आणि तुम्हाला उंचीची भीती वाटत नसेल, तरच तुम्ही इथे जाण्याचा विचार करू शकता.