हा फोटो पाहून तुमच्यापैकी अनेकांना या कँडी किंवा पॉपसिकल्स खाण्याचा मोह होत असेल. हे पॉपसिकल्स एवढे आकर्षक दिसतायत की ते एखाद्याला खावेसे वाटले नाही तर नवल. पण असा काही विचार तुमच्या मनात येण्याआधी फोटोत दिसणारे हे पॉपसिकल्स जरा नीट निरखून पाहा, हे फोटो पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेलच की यात नक्कीच काहीतरी काळबेरं आहे.
लोकांची जनजागृती करण्यासाठी तैवानमधल्या तीन विद्यार्थ्यांनी मिळून हे पॉपसिकल्स तयार केले आहेत. अनेक देशांसारखा तैवानला देखील प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. त्यातून जलप्रदूषणाचा प्रश्न तर ऐरणीवर आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे दूषित झालेलं पाणी तैवानमध्ये येतं. लोकांना दूषित पाणी प्यावं लागल्यानं अनेक आरोग्यांच्या समस्यांचा सामना त्यांना करावा लागत आहे आणि याच प्रश्नांकडे जगाचं लक्ष वेधण्यासाठी तैवान विद्यापीठाच्या तीन विद्यार्थ्यांनी एक प्रयोग केलाय. ‘१०० टक्के दूषित पाण्यापासून तयार करण्यात आलेले पॉपसिकल्स’ अशी जाहिरात करून त्यांनी या पॉपसिकल्सनां आकर्षक असं पॅकेजिंगही केलं आहे. घाण, मृत मासे, किडे, प्लॅस्टिक, इतर टाकाऊ पदार्थ वापरून त्यांनी हे तयार केलंय.
अशा प्रकारे जाहिरात करुन जलप्रदूषणाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. त्यांच्या या प्रयोगाची माध्यामांनी देखील दखल घेतली आहे. प्रत्येकाला पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळालेच पाहिजे हा आमचा हेतू आहे आणि यासाठी जनजागृती करण्याकरता आपण ही मोहिम सुरू केली असल्याचंही त्यांनी ‘सीएनएन’ला सांगितलं.