शाळेतील दिवस किती सुंदर असतात ना! कशाची चिंता नाही अन् कशाचीही पर्वा नाही फक्त मज्जा मस्ती करायची, फक्त खेळायचे. तेव्हा अभ्यास करताना सुद्धा मज्जा यायची. कधी शिक्षक छान छान गोष्टी सांगत असे, छान छान कविता शिकवत असे, नवनवीन खेळ शिकवत. चित्र काढायला शिकवत असे. शिक्षकांसमोर आपले कौशल्य दाखवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी उत्साही असतात जेणेकरून शिक्षकांकडून कौतुकाची थाप मिळावी. शिक्षकांसमोर कोणी गाणे गाते, कोणी गोष्ट सांगते, कोणी आपले कला कौशल्य दाखवते. अशाच काही उत्साही विद्यार्थ्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये काही शाळकरी मुले शिक्षकांसमोर ढोल ताशा वादन केले आहे तेही ढोल आणि ताशा न वापरता. होय तुम्ही योग्य तेच वाचत आहात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की शाळकरी मुले दिसतात. कोणी बेंचचा ढोल बनवला आहे तर कोणी कंपासचा ताशा, कोणी पाण्याची बाटली अन् पेन वापरून घंटेचा नाद निर्माण केला आहे. सर्व मुलं उत्साहाने आणि संपूर्ण उर्जेने सुंदर ढोल ताशा वादन करत आहे. विशेष म्हणजे वर्गामध्ये दोन शिक्षिका देखील उपस्थित असल्याचे दिसते. वर्गातील इतर विद्यार्थी विद्यार्थांचे वादन तल्लीन होऊन ऐकत आहे. व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

इंस्टाग्रामवर projectasmi_pune नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये या व्हिडिओबाबत माहिती दिली आहे. कॅप्शनमध्ये सांगितले हे की, projectasmiअंतर्गत या महिन्यात अनेक शाळांमध्ये शेवटचे सत्र घेण्यात आले. शाळेतील मुलांना आता पुढच्या वर्षी भेटू असं सांगितलं की, दरवर्षीच वेगवेगळे अनुभव येतात. मुलं अचानक शांत होतात, कधी मिठ्या मारतात, कधी रडतात, फोन नंबर घेतात, वाकून नमस्कार करतात. हे सगळ्याच शाळांमध्ये घडतं. पण काही शाळांमधील विद्यार्थी हट्टच धरतात की, आता तुम्ही येणार नाही त्यामुळे आम्हाला आजच डान्स करून दाखवायचा आहे, ढोल ताशा वाजवून दाखवायचा आहे, भाषण ,कविता ऐकवायची आहे. त्यांच्या या गोड हट्टापुढे त्यांच्या शिक्षकांनाही मान हलवावी लागते आणि मग असे काही अनमोल क्षण हाती लागतात. एका व्हिडिओत मुलं किती passionately ढोल ताशा वाजवत आहेत बघा. त्यांच्या अंगात तो ताल, लय भिनली आहे असं जाणवतं. साधी कंपासपेटी, बेंच आणि चक्क पाण्याची बाटली वाजवून ढोल ताशाचा वाजवत ऐकत असल्याची जाणीव होते. कितीही वेळा तो व्हिडिओ बघितला तरी त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघून प्रत्येक वेळी तितकाच आनंद होतो. हे समरसून जाणं इतकं मोहक आहे की, आपल्याला आता असं जमत नाही ही भावना छळायला लागते. अख्खा वर्ग त्यात रमलाय. हे बघून सुद्धा “आजचा दिवस सार्थकी लागला असे वाटते.”

व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी मुलांचे तोंडभरून कौतुक केले.

एकाने लिहिले, “शिक्षकांच्या चेहऱ्यावरील हसू पाहण्यासारखे आहे”

दुसऱ्याने लिहिले की,”अरे यांना शिक्षकांसमोर करायला मिळतंय आम्हाला तर लपून लपून करायला लागायचं काय मजा होती राव…”

तिसऱ्याने कमेंट केली की,” शाळांमध्ये असे मोकळे वातावरण मिळणे खरोखर गरजेचे आहे. खरचं कौतुकस्पद आहे”

चौथ्याने म्हटले की, “शाळेतील दिवस आठवले”
पाचव्याने लिहिले की, “हे फक्त शेवटच्या बाकावर बसणारे विद्यार्थीच करू शकतात”

काय आहे प्रोजेक्ट अस्मी?
‘प्रोजेक्ट अस्मी’ हा डॉ. कल्पना व्यवहारे फाउंडेशनद्वारे वंचित शालेय मुलांच्या मानसिक आणि भावनिक कल्याणासाठी समर्पित एक खास उपक्रम आहे.