पबजी आणि टिकटॉक या दोन अॅपनी भारतात धुमाकूळ घातला होता. गेमर्सना तर पबजीचे जणू वेडच लागले होते. टिकटॉकने अनेकांना त्यांचे कला कौशल्य दाखवण्यासाठी व्यासपीठ दिले. मात्र, पबजीच्या आहारी जाऊन अनेकांनी टोकाचे पाऊल उचलले. भारताने या दोन्ही अॅपवर बंदी घातली आहे. आता आणखी एका देशाने या दोन्ही अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
अफगाणिस्तानने टिकटॉक आणि पबजी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. अहवालांनुसार, पुढील तीन महिन्यांत या दोन्ही अॅपवर बंदी घालण्यात येणार आहे. अमेरिकी सैन्याने अफगाणिस्तान सोडल्यानंतर या देशात आता तालिबानचे राज्य आहे. सुरक्षा क्षेत्रातील प्रतिनिधी आणि शरिया कायदा अंमलबजावणी प्रशासनाच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत तालिबानने टिकटॉक आणि पबजी या दोन्ही अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
सुरक्षा क्षेत्रातील प्रतिनिधी आणि कायदा अंमलबजावणी प्रशासनाच्या प्रतिनिधीने ९० दिवसांत हे दोन्ही अॅप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
अफगाणिस्तानच्या दूरसंचार आणि इंटरनेट सेवा प्रदान करणाऱ्यांनी या बंदीबाबत माहिती दिली. तसेच त्यांना निर्धारित वेळेत मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वी तालिबानच्या नेतृत्वाखालील अफगानिस्तानच्या अंतरिम सरकारने २३ दक्षलक्षाहून अधिक वेबसाइट्सना ब्लॉक केल्याची माहिती समजली होती. या वेबसाइट्सवर अनैतिक सामग्री दाखवली जात असल्याचा दावा तालिबानने केला होता.
तालिबान सत्तेत आल्यापासून अर्थव्यवस्था डबघाईला
अफगाणिस्तानात सत्ता मिळाल्यापासून तालिबानकडून मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे. तालिबानच्या भितीपोटी अनेक नागरिकांनी देश सोडले आहे. मुलींना त्यांच्या स्वातंत्र्यापासून वंचित ठेवले जात आहे.