ऑगस्ट २०२१ तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबीज केल्यानंतर महिलांसाठी अनेक निर्बंध लागू केले. यात सार्वजनिक ठिकाणी महिलांना हिजाब अनिवार्य करण्यापासून ते किशोरवयीन मुलींना शाळेत जाण्यापासून रोखण्यासारख्या नियमांचा समावेश आहे. या निर्बंधांमुळे महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा आणली गेली आहे. आता, तालिबान सरकारने व्यवसाय मालकांना त्यांच्या स्टोअरमधील पुतळ्यांचे डोके काढून टाकण्याची सूचना देणारा एक विचित्र आदेश लागू केला आहे.

हा आदेश लागू करण्यामागचं कारण काय ?

सद्गुणांचा प्रसार आणि दुर्गुणांच्या प्रतिबंधासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष मंत्रालयानुसार, मानवी स्वरूपाचे प्रतिनिधित्व करणारे हे पुतळे इस्लामिक कायद्याचे उल्लंघन करतात.

एजन्सी फ्रान्स प्रेस या वृत्तसंस्थेने सामायिक केलेल्या व्हिडिओमध्ये दुकानदार नवीन हुकुमाचे पालन करत असून पुतळे काढताना दिसत आहेत. हेरात प्रांतातील मंत्रालयाचे प्रमुख अझीझ रहमान म्हणाले की हे पुतळे गैर इस्लामिक असल्या कारणाने ते नष्ट केले पाहिजेत. काही दुकानदारांनी पुतळ्याचे डोके कपड्यामध्ये झाकून आदेशाला बगल देण्याचा प्रयत्न केला. परंतु गंभीर दंडाची चेतावणी मिळताच त्यांना या आदेशाचे पालन करावेच लागले.

या आदेशामुळे व्यवसाय मालक अजिबात खुश नाहीत. त्यांना फक्त विक्री गमावण्याचीच भीती नाही, तर दुकानातील पुतळे खराब करणे त्यांना जास्त महागात पडले आहे. “आमच्या दुकानात १५ पुतळे असून सर्वांचेच डोके काढण्यासाठी आम्हाला भाग पडले आहे. यामुळे आम्हाला प्रत्येकी २ ते ३ हजार अफगाणी रुपये इतके नुकसान झाले आहे.” असे एका दुकानदाराने म्हटले आहे. तसेच, “पुतळेच नसतील तर आम्ही आमचा माल ग्राहकांपर्यंत कसा पोहचवणार?” असे देखील त्याने एजन्सी फ्रान्स प्रेसला सांगितले.

हेही वाचा : ‘या’ शहराचा असणार स्वतःचा चंद्र; रोबोट देणार सेवा, तर हवेत उडणार कार

“हे क्रूर असून लहान मुलांच्या वागण्याचा हा प्रकार आहे. देशाचे नेतृत्व करणारे सरकार असे वागत नाहीत. यातून तालिबानचा ओंगळवाणा चेहरा दिसून येतो.” असे अफगाण महिला हक्कांचा प्रचार करणाऱ्या आणि सध्या यूकेमध्ये राहणाऱ्या मार्जिया बाबकरखाइल यांनी द इंडिपेंडंटला सांगितले. हा नवीन निर्णय अफगाण नागरिकांना, विशेषतः महिलांना घाबरवण्यासाठी आणि त्यांना घरांमध्ये कैद घेण्यात आला असल्याचा आरोप बाबकरखाइल यांनी केला आहे. ‘जर तालिबान बाहुल्या स्वीकारू शकत नसतील तर ते स्वतंत्र आवाज असणारी महिला कशी स्वीकारतील?’ असं त्या पुढे म्हणाल्या.

Story img Loader