Talking Crow Virl Video : तुम्ही आतापर्यंत पोपटाला बोलताना पाहिलं असेल. तीव्र स्मरणशक्तीसाठी ओळखला जाणारा पोपट ऐकलेल्या गोष्टी कधी विसरत नाही. तो अनेकदा व्यक्तींच्या आवाजाची नक्कलही करताना दिसतो. पण, पोपटाप्रमाणे कावळ्याला तुम्ही माणसांप्रमाणे कधी बोलताना पाहिलं आहे का? होय, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, पण पालघर जिल्ह्यातील एका गावात चक्क माणसांप्रमाणे बोलणारा एक कावळा आता चर्चेत आला आहे. या बोलक्या कावळ्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
पालघरमधील शहापूर तालुक्यातील गारगावं या ठिकाणी हा कावळा आढळून आला. या गावातील मंगल्या मुकणे यांच्या घरात हा माणसाळलेला कावळा राहतो. मुकणे यांना तीन वर्षांपूर्वी पावसाळ्यात त्यांच्या घराजवळ हा कावळा सापडला. यावेळी तो अवघ्या काही दिवसांचा होता.
कावळा चक्क आई, बाबा, काका, ताई अशी मारतो हाक
त्यांच्या मुलांनी त्याला खाऊ पिऊ घालून लहानाचं मोठं केलं. या कावळ्याला काळ्या या नावाने हाक मारली जाते. तो अगदी घरातल्या सदस्यांप्रमाणे त्यांच्या घरात राहतो. तो संपूर्ण घरात फिरतो, खातो, अनेकांच्या अंगा-खांद्यावर खेळतो, त्यामुळे घरातील लोकांना त्याचा चांगलाच लळा लागला आहे. विशेष म्हणजे घरातील कुत्रे-कोंबड्यादेखील त्याच्याबरोबर खेळतात. या कावळ्याला कोणी धरण्याचा प्रयत्न केला तर कुत्रे त्यांच्या अंगावर धावून जातात. हा कावळा चक्क आई, बाबा, काका, ताई, दादा, दादी, हट अशी हाक मारतो.
कावळा मारतोय काकांना हाक
व्हायरल व्हिडीओतही तुम्ही पाहू शकता की, हा कावळा एका घरातील बाकड्यावर बसून काका, काका अशी हाक मारतोय. पण, हाक देऊनही कोणतेही उत्तर न आल्याने तो प्रश्न विचारतोय की, काका कुठे आहेत? त्यामुळे हा बोलणारा कावळा आता चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. विशेष बाब म्हणजे तो घरातील व्यक्तींनी विचारलेल्या प्रश्नांनाही अगदी नीट उत्तर देतो, त्यामुळे कावळ्याचं माणसांप्रमाणे बोलणं ऐकून अनेकांना धक्काच बसला आहे.
बोलक्या कावळ्याचा हा व्हिडीओ @sanjay.landge.71 नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर आता अनेक जण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने मिश्लीकपणे लिहिले की, काकाला घेऊन गेल्याशिवाय गप्प बसणार नाही हा. दुसऱ्याने लिहिले की, काका घाबरून बसलाय, आता काय येत नाही बाहेर. तिसऱ्याने लिहिले की, पोपट सोडून आता कावळाच पाळतो.